Delhi Election 2025 : “महिलांना कबुल केल्याप्रमाणे २५०० रूपये द्या…”; आतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Rekha Gupta | Atishi Marlena । Delhi Election 2025 – दिल्लीत नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारांसह मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी आमदारांच्या हातात फलक होते, ज्यात महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या की, रेखा गुप्ता यांच्यासोबत झालेल्या भेटीत आम्ही दिलेल्या आश्वासनांनुसार महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याबाबत बोललो. पंतप्रधान मोदींनी ८ मार्चपर्यंत २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही त्यांना सांगितले आहे की त्यांनी त्यांचे वचन पाळले पाहिजे. यावर त्या (रेखा गुप्ता) ८ मार्चपर्यंत नक्की पैसे मिळतील अशी आम्हाला ९९ टक्के खात्री आहे असे आतिशी म्हणाल्या.
आम्ही दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागत होतो. आम्हाला वेळ मिळाला नाही. आज अधिवेशनादरम्यान आम्ही मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना सांगितले की पहिल्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन होते, ते वचन मोडले गेले आहे. आम्हाला आशा आहे की महिला सन्मान योजनेचा पहिला हप्ता ८ मार्च रोजी मिळेल.
दिल्लीत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आम आदमी पक्ष (आप) भाजपवर सतत हल्ला करत आहे. रविवारी (२३ फेब्रुवारी) आतिशी म्हणाल्या, दिल्लीच्या लोकांनी आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका सोपवली आहे आणि एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून, आम्ही भाजप सरकार दिल्लीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल याची खात्री करू. आम आदमी पार्टी सभागृहात जनतेचे प्रश्न पूर्ण ताकदीने उपस्थित करेल. दिल्ली आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील.
त्याच वेळी, सरकारने आश्वासनांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांना उत्तर देताना मंत्री डॉ. पंकज सिंह म्हणाले की, भाजपने जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. ते म्हणाले, आम्ही जनतेला खोटी आश्वासने देत नाही. आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सरकार काम करत आहे.





