Delhi Assembly : दिल्ली विधानसभा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॅरिकेड तोडून एक अज्ञात कार थेट विधानसभेच्या आवारात घुसल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेदरम्यान विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने शाईफेक केल्याची माहिती समोर आली आहे. शाई फेकताच संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला. सुरक्षा रक्षकांना काही कारवाई करण्याआधीच आरोपी पसार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे विधानसभेच्या सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात येत आहे. (Delhi Assembly) ही घटना नेमकी कोणी आणि कोणत्या उद्देशाने घडवली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्रशासनाकडून सुरक्षा अधिक कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहेत विजेंद्र गुप्ता? Delhi Assembly विजेंद्र गुप्ता हे तीन वेळा आमदार राहिलेले भाजप नेते असून 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांची दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी राजकारणातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ते दिल्ली विद्यापीठाचे उपाध्यक्ष, नगरसेवक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत होते. रोहिणी मतदारसंघातून ते 2015 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांनी दिल्ली भाजप अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. पूर्वीही घडली होती सुरक्षा घटना Delhi Assembly 20 ऑगस्ट 2025 रोजी सार्वजनिक सुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला होता. आरोपीने तक्रारदार असल्याचे भासवत त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत मुख्यमंत्री जखमी झाल्या होत्या. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. सध्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा राजधानीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. (Delhi Assembly)