Jaishankar : दिल्लीचे परदेशात नाव घ्यायला लाज वाटते: परराष्ट्रमंत्री जय शंकर; निवडणुकीत दिल्लीकरांना सत्ता बदलण्याचे केले आवाहन

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजप आणि आपमध्ये वाफयुद्ध रंगल्याचे पाहिले मिळत आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. अशातच केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आप सरकारने दिल्ली शहर मागे सोडले असून दिल्लीतील लोकांना शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, घरे आणि इतर सुविधा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल चढविला.
राजधानीतील लोकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे परदेशात कबूल करायला लाज वाटते असे देखील जयशंकर म्हणाले. यामुळे या निवडणुकीत सत्ता परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी दिल्लीतील नागरिकांना केले. दक्षिण भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले, “जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा जगापासून एक गोष्ट लपवतो. देशाच्या राजधानीत राहणाऱ्या लोकांना घरे मिळत नाहीत, सिलिंडर मिळत नाही, जल जीवन मिशन अंतर्गत पाईपने पाणी मिळत नाही आणि त्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नाही, असे परदेशात जाऊन सांगायला मला लाज वाटते.”
५ फेब्रुवारीला सरकार बदला
राजधानी म्हणून दिल्ली हे देशातील सर्वोत्कृष्ट विकासाचे मॉडेल असले पाहिजे, परंतु गेल्या 10 वर्षांपासून ते मागे पडले आहे, असा आरोप जयशंकर यांनी आप सरकारचे नाव न घेता केला. दिल्लीतील रहिवाशांना त्यांचे पाणी, वीज, गॅस सिलिंडर आणि आरोग्यसेवेचा हक्क देण्यात आलेला नाही. जर इथले सरकार तुम्हाला तुमचे अधिकार देत नसेल तर तुम्हीही ५ फेब्रुवारीला हे सरकार बदलण्याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले.
निवडणुकीत चुरस दिसणार
दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होणार आहे. आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत आहे. याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी दशकभर सत्तेत असूनही शहरातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. यंदाची दिल्ली विधानसभेसाठीची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.





