पिंपरी | देहूत इंद्रायणी नदीची स्वच्छता युद्धपातळीवर

देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आषाढी पायी वारी ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी भाविक वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने देहू नगरपंचायतीच्या वतीने विविध कामाचे नियोजन करण्यात आले असून कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्यात प्राधान्याने आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या कामे केली जात असून इंद्रायणी नदीची स्वच्छता, नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाविक, वारकऱ्यांच्या सोयी सुविधांच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागाकडून कामांसाठी लगबगही सुरू आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढणे, नालेसफाई, पावसाळी गटारी, बंदिस्त गटारे स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्याच्या अनुषंगाने नवीन भुयारी गटाराची कामे सुरू आहे. मंदिर परिसर व इंद्रायणी घाट स्वच्छता करण्यात येत आहे. पथदिव्यांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
डीडीटी पावडर, जंतुनाशक फवारणी, धूर फवारणी करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी टँकर उपलब्ध करण्यात येणार आहेत .तसेच मोबाइल टॉयलेट उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जलपर्णी काढण्याचे काम वेगात
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे येत्या २८ जून रोजी प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी व पायी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी देहूत दाखल होतील. इंद्रायणी नदी हा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
नदीतील जलपर्णी हटवणे हे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या शेकडो कर्मचारी आणि जेसेबी, पोकलॅनच्या सहाय्याने नदीतील जलपर्णी काढण्याचे काम वेगाने करत आहेत. त्यासह देहू शहरातील नालेसफाई, गटार स्वच्छ करण्यात येत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना
देहूत पालखी सोहळ्यासाठी येणारे वारकरी इंद्रायणी दर्शन आणि स्नानाला प्राधान्य देतात. त्यामुळे इंद्रायणी स्वच्छता व गुणवत्ता सुधारण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. तसेच भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून डीडीटी पावडर, जंतुनाशक फवारणी, धूर फवारणी, मोबाइल टॉयलेट ही कामेही प्रशासनाकडून नियोजित आहेत. तसेच भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करण्यात येणार आहे.
नदीचे पावित्र्य जपा
इंद्रायणीचे प्रदूषण हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरवर्षी पालखी आणि बीज सोहळ्यानिमित्त येथे स्वच्छतेची कामे होताना दिसतात. परंतु, कायमस्वरूपी इंद्रायणी नदी कशी स्वच्छ राहील यासाठी उपाययोजना कराव्यात व नदीचे पावित्र जपावे, अशी मागणी वारकरी करत आहेत.





