पिंपरी | अतिक्रमणाच्या विळख्यात रस्ते, देहूगावात वाहतूककोंडी नित्याची

देहूगाव, (वार्ताहर) – येथील मुख्य प्रवेशद्वाजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. उपस्थित नागरिकांनी ते वाहन ढकलून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
मात्र या ठिकाणी वाढलेली अतिक्रमणे, अवजड वाहनांची वाहतूक आणि नित्याची वाहतूक कोंडी हे प्रश्न यामुळे ऐरणीवर आले आहेत.
तळवडे, चाकण आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यातील आणि तीर्थक्षेत्र देहू मध्ये दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.
राज्य शासनाने अंतर्गत भागामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत गावाबाहेरुन (रिंग रोड) बाह्यमार्ग बनविला आहे. परंतु देहू – देहूरोड आणि देहू – आळंदी एकेरी मार्ग असून अरूंद रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली दिसत आहेत.
दिवसेंदिवस रस्ते लहान होत चालले असून त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने रस्त्यांच्या दुतर्फा आणि चौकातील अतिक्रमणे बेसुमार वाढली आहेत. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी गावात आठवडे बाजार असतो.
त्यामुळे याकाळात तर वाहतूक कोंडी होतेच होते. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी रस्ते अरुंद झालेत, मार्गावर दुतर्फा अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. मात्र प्रशासनाने यावर कोणतेही पाउल उचलताना दिसत नाही.
अवजड वाहनांना प्रवेशबंदीची मागणी
देहूगावच्या उत्तर व दक्षिण भागातून बाह्यवळण (रिंग रोड) रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गाने अवजड वाहने पाठविण्यात यावीत. प्रवासी वाहतूक, पीएमपीएल बसेस वगळता इतर अवजड वाहनांना अंतर्गत भागात प्रवेश बंदी करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





