पिंपरी | देहूत इंद्रायणी नदी पात्र प्रदूषितच

देहूगाव, (वार्ताहर) – आषाढी वारी अगदी काही दिवसांवर आली असून या वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱयातून श्री क्षेत्र देहू येथे येत असतात. मात्र, इंद्रायणी नदीचे प्रदूषण अद्यापही कायम असून देहूत नदीपात्रातील जलपर्णीची दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषित पाणी पवित्र तीर्थ म्हणून सेवन करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वेळीच प्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे.
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी येत्या २८ जूनला श्री क्षेत्र देहूतून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर, देऊळवाडा आणि वैकुंठस्थान जवळील इंद्रायणीचे पात्र स्वच्छ कधी होणार ? अशी विचारणा स्थानिक नागरिक आणि भाविक करत आहेत.
देहू ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून इंद्रायणीच्या पात्रात जलपर्णीला काही प्रमाणात आळा घातला होता. परिणामी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थानाजवळील इंद्रायणीचे पात्र स्वच्छ होते. तसेच या भागात नौकानयनही सुरु होते.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थानाजवळील नदीपात्रात जलपर्णी सतत वाढत आहे. त्यामुळे, भाविकांची गैरसोय होत आहे.तर, देवदर्शनासाठी इंद्रायणी नदीचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून सेवन करण्याची वारकऱ्यांमध्ये प्रथा आहे.
मात्र, इंद्रायणीचे पाणी दूषित असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आगामी काळातील पायी पालखी सोहळ्याच्या दृष्टीने देहू नगरपंचायतीच्या वतीने नदीपात्रातील जलपर्णी काढून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करून वारकऱयांसाठी स्वच्छ असे इंद्रायणी पात्र उपलब्ध करून द्यावे.





