महायुतीतच ‘पक्षांतर युद्ध’! दादांनी दिले जशास तसे उत्तर;भाजपातील नाराज राष्ट्रवादीच्या तंबूत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुण्याच्या राजकारणात सध्या ‘पक्षांतराचा’ जोरदार सामना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या धक्क्याची परतफेड करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
पवार यांनीसुद्धा भाजपमधील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेत जशात तसे उत्तर दिले आहे.गेल्या काही दिवसांत पुणे शहरात भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक आणि प्रभावी पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात खेचले होते. हा उपमुख्यमंत्री पवार यांच्यासाठी एक राजकीय धक्का मानला जात होता.
त्या वेळी आपल्याच महायुतीतील मित्रपक्षाने केलेल्या या खेळीवर पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि गप्प बसणार नाही, असा सूचक इशाराही दिला होता. याशिवाय युतीमधील आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा आगामी काळात पक्षात प्रवेश देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार सोमवारी भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, किरण बारटक्के यांनी धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
याशिवाय रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अशोक हरणावळ, भाजपचे संदीप जऱ्हाड, सुनीता गलांडे यांनीही हातात घड्याळ बांधले आहे. या सर्व घडामोडींमुळे पवार यांनी भाजपने केलेल्या खेळीची परतफेड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.





