Nagar | उपसरपंच निवडणुकीत कोल्हे गटाचा पराभव

कोपरगाव, (प्रतिनिधी): – तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून काळे गटाच्या निशा खंडीझोड विजयी झाल्या आहेत.
शहापूर ग्रामपंचायतीचे काळे गटाचे विद्यमान उपसरपंच सागर किसन घारे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच योगिता घारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. शहापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद काळे गटाकडे असून, दोन्ही गटाचे मिळून एकून सात सदस्य आहेत.
पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे दत्तात्रय पाचोरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
काळे गटाच्या निशाताई खंडिझोड ह्या विजयी झाल्या आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सुरेश रहाणे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित उपसरपंच निशा खंडीझोड यांचे मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.





