किल्ले शिवनेरीच्या प्रवेशद्वाराजवळ दिवाळीनिमित्त ‘दीपोत्सव’

जुन्नर – दिवाळी(धनत्रयोदशी) निमित्ताने सेवा फाउंडेशन जुन्नर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी चा पायथा ते प्रथम प्रवेशद्वार येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरी येथील पर्यटनास तसेच दर्शनास परवानगी नसल्याने अनेक शिवभक्त तसेच संस्था येऊ शकत नसल्याने दिवाळी कालखंडात दीपोत्सवात खंड न पडू देता तसेच आपली अस्मिता जपन्याचा केला गेलेला एक प्रयत्न सेवा फाउंडेशन जुन्नरद्वारे यशस्वीपणे पार पाडण्यात आला. सेवा फाउंडेशन च्या सभासदांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्रीदत्तमंदिर ते किल्ले शिवनेरीच्या मुख्य प्रवेशद्वारा पर्यंत २२२२ दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
मुख्य प्रवेशद्वारासमोर व दत्तमंदिर येथे भव्य अशी रांगोळी काढून सेवा फाउंडेशन सदस्यांनी स्वतः बनवलेला इकोफ्रेंडली आकाश कंदील लावण्यात आला. शासनाच्या नियम व अटींचे पालन करत दिपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी देखील सेवा फाउंडेशन च्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले असून विजयादशमीला संस्थेच्या वतीने किल्ले चावंड येथे सफाई मोहीम राबवून किल्ल्याचे प्रवेशद्वार, चावंडादेवी मंदिर,शिवमंदिर आणि गडावरील एकमेव तोफेला तोरण बांधले होते.
खानगाव येथील शाळेस शॅलोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले होते तसेच धामनखेल येथील नंदनवन या अनाथ मुलांच्या अनाथ आश्रमास किराणा माल व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले होते.




