Pune District : शिवनेरीला लाल दिवा मिळावा

नारायणगाव : आजपर्यंत शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान मोदींसह राज्याचे अनेक मुख्यमंत्री येऊन गेलेत; परंतु शिवनेरीला लाल दिवा मिळाला नाही. एकनाथ शिंदे शिवनेरीचा मान वाढवतील, असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार शरद सोनवणे यांनी केले.
नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश ऊर्फ बाबूभाऊ पाटे, विद्यमान सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, देवराम लांडे, जीवन शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28 फेब्रुवारी) सायंकाळी उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवजन्मभूमीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. आमदार सोनवणे म्हणाले की, जुन्नर तालुक्यात कॉमन मॅन असलेले व माझ्या राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेले, वर्षा बंगला माझा नसून मायबाप जनतेचा आहे असे सांगणारे पहिले मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रोजगार निर्मितीसाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी झाली पाहिजे. जुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी असून येणार्या पर्यटकांना आपण शिवजन्मभूमीत आलो असल्याची खात्री होण्यासाठी सीएसआर फंडातून चार भव्यमहाद्वारे निर्माण करावीत. जुन्नर तालुक्याची बाजारपेठ मोठ्या ताकदीने उभी राहण्यासाठी दार्या घाट तोडून मुंबईला जाणारा रस्ता तयार करावा. आजपर्यंत दोन मुख्यमंत्र्यांनी नारळ वाढविले परंतु कामाला सुरुवात झालेली नाही.
श्रीक्षेत्र ओझर येथील जलाशयात स्पीड बोट व नौकानयन चालू करण्यास परवानगी द्यावी. पठाराला पाणी देण्याची व्यवस्था करावी. आदिवासी भागातील बुडीत बंधारे व कोपरे मांडवे येथे एमआय टँक द्यावेत. नारायणगाव एसटी बस स्थानकामध्ये अद्यावत पार्किंग व्यवस्था उभी करून द्यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत शरद सोनवणे यांना मदत करू शकलो नाही; परंतु पुढील काळात हातात हात घालून काम करणार असल्याचा शब्द दिला आहे.
– बाबुराव पाटे, उपसरपंच, नारायणगाव





