Shivneri Fort Stampede : शिवजयंती सोहळ्यापूर्वी शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरी; शिवभक्त जखमी
Shivneri Fort Stampede : किल्ल्यावरील अंबरखाना परिसरातील अरुंद दरवाजात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
Shivneri Fort Stampede : छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त मोठा उत्साह सुरू आहे. मोठ्या संख्येने शिवभक्तांची शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि याचदरम्यान चेंगरीचेंगरीची घटना घडली आहे.
किल्ल्यावरील अंबरखाना परिसरातील अरुंद दरवाजात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही शिवभक्त जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मध्यरात्री शिवनेरी नेमकं काय झालं?
शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यांच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद दरवात गर्दी अवाक्याबाहेर झाली.
येथील जागा अरुंद असल्याने आणि लोकांची संख्या प्रमाणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीची स्थिती झाली. यात काही शिवभक्त खाली पडले आणि जखमी झाले.
दरम्यान, किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण शिवनेरी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून भगव्या रंगात न्हाऊन निघाला असून शिवभूमीचे दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
गावागावांमधून शिवभक्त सायकल रॅलीसह पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर पोहोचले आहेत. मात्र या घटनेदरम्यान येथे पोलिस प्रशासन नसल्याची माहिती समोर आली आहे. पुरेसा बंदोबस्त नसल्याने चेंगराचेंगरीची घटना घडल्याचेही काहींनी म्हंटले आहे.
हेही वाचा :
Pune Crime : शेजाऱ्याकडे भांडी मागायला गेले अन् जीव गमावला; धक्कादायक घटनेने खळबळ






