शिवनेरी जवळच्या प्राचीन वाड्यांचे होणार संवर्धन

पुणे – जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील गावांमध्ये असलेल्या प्राचीन वाड्यांचे जतन करून त्यांचे ‘हेरिटेज होम स्टे’मध्ये रूपांतर करण्याचा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या पुढाकाराने जुन्नर आणि बारामती तालुक्यांतील वाड्यांच्या संवर्धनासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आले आहेत. या अभ्यासगटांच्या अहवालानंतर ही योजना प्रत्यक्षात राबवण्यात येणार आहे.
शहरीकरणाच्या झपाट्यामुळे गावांचे पारंपरिक स्वरूप आणि मराठी वास्तुशैली नष्ट होत चालली आहे. ऐतिहासिक दगडी वाडे आणि घरे यांची दुरवस्था झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर प्राचीन वाड्यांचे जतन करताना ‘हेरिटेज होम स्टे’ ही संकल्पना साकारण्यात येणार आहे.
या प्रकल्पात हेरिटेज आर्किटेक्ट, वाडा अभ्यासक, गिर्यारोहण संस्था, गट विकास अधिकारी यांचा समावेश असलेले दोन अभ्यासगट तयार करण्यात आले आहेत. हा उपक्रम पथदर्शी म्हणून प्रथम जुन्नर व बारामती तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार असून, नंतर राजगड व लोहगड किल्ल्यांच्या परिसरातही विस्तार करण्यात येणार आहे. जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने ‘हेरिटेज होम स्टे’ची संकल्पना मांडली होती.
या संस्थेच्या पुढाकारातून वाडा अभ्यासक, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, ऐतिहासिक वास्तू संवर्धक यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्रभावी योजना आखण्यात येणार असून, इच्छुक वाडा मालकांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून नोंदणीकृत होम स्टे तयार केले जातील. या प्रकल्पाची नोंदणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व विविध ऑनलाइन हॉटेल बुकिंग संकेतस्थळांवर करण्याचा प्रस्तावही जिल्हा परिषदेने सादर केला आहे.
‘प्रत्येक वास्तू, घर, वाडा हे संस्कार करणारे असतात. मात्र शहरीकरणामुळे व ऐतिहासिक वास्तूंबाबत असलेल्या अनास्थेमुळे अनेक वाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे गावांचे सौंदर्य व सांस्कृतिक वारसा लुप्त होत आहे. या पारंपरिक वाड्यांचे जतन करून ‘हेरिटेज होम स्टे’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे




