Pune : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती येथे दीपोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजारा

पुणे: गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि ऐतिहासिक परंपरेला साजेसा अशा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर शेकडो दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्मरण करण्यात आले.
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवराय १९ मार्च १६४७ रोजी प्रथमच पुण्यात आले. त्यांनी श्री कसबा गणपती मंदिर उभारून येथे नंदादीप प्रज्वलित केला. त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानाचे संस्थापक योगेश शामकांत सोनवणे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी १९ मार्च रोजी प्रतिष्ठानतर्फे दीपोत्सव साजरा केला जातो.
या मंगलमय सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, गडकिल्ले संवर्धनासाठी झटणारे अभ्यासक आणि इतिहासप्रेमी मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला आनंद पिंपळकर गुरुजी (वास्तुशास्त्र तज्ञ), संदीप सिंग गिल्ल (पुणे शहर पोलीस उपआयुक्त), पंडितदादा मोडक (गौरक्षक, संस्थापक – सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, वडकी, पुणे), चेतन शेळके (अध्यक्ष – विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वारजे माळवाडी प्रखंड), आदित्य मांजरे (नियोजन प्रमुख/धारकरी – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुणे जिल्हा) आणि ओंकार वाळुंज (अध्यक्ष – शिवमुद्रा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाला शेकडो मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे विश्वस्त संगीता ठकार यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, पुणे जिल्हा अध्यक्ष आशिष भोसले आणि सुनील भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शेकडो मावळ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे दीपोत्सव अधिक भव्य आणि ऐतिहासिक बनला. भविष्यातही शिवसंस्कृती आणि गडकिल्ले जपणाऱ्या कार्यासाठी प्रतिष्ठान अशाच उपक्रमांचे आयोजन करत राहिल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.





