Sadabhau Khot | Elections News : सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने निवडणुकीसाठी उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास टाकून त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले आहे. तसेच सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनादेखील भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मविआचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी आहे. तसेच, भाजपने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच सदाभाऊ खोत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला ही उमेदवारी घोषित केली आहे.
राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यासाठी मी ही उमेदवारी समर्पित करतो. सर्व घटकांना घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आहे. १८ पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपने केले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपने दिली आहे. मी याबद्दल निश्चित ऋणी राहिन.’ असं ते यावेळी म्हणाले.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, “सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपकडे बघावं लागेल. या पक्षाने रामदास आठवले, माधव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम भाजपने सुरुवातीपासून केले आहे. तसेच निश्चित सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे भाजपने केले आहे’. अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.