पावसाअभावी आडसाली ऊस लागवडीत घट

पुढील वर्षी साखर कारखान्यांसमोर ऊस उपलब्धतेत अडचण
रांजणी – यंदा पावसाचे जवळपास अडीच महिने होत आले असून अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्याचा फटका आडसाली उसाच्या लागवडीला बसला आहे. यंदा केवळ 19 टक्केच ऊस लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी साखर कारखान्यासमोर उसाचा मोठा प्रश्न उपस्थित राहणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
चालू वर्षी जूनच्या अखेरीस काही प्रमाणात पावसाने सुरुवात केली. जुलैमध्ये पहिल्या पंधरवाड्यात पाऊस पडला नव्हता. एक जून ते आठ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 612.3 मिलिमीटर पैकी 603.5 मिलिमीटर म्हणजेच 98 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात 722.2 मिलिमीटर म्हणजेच 118 टक्के पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे साहजिकच कमी पाऊस पडल्याने आडसाली ऊस लागवड करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील उस लागवडीचे चित्र पहाता यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 15 ते 19 टक्के उसाच्या लागवडी झाल्या आहेत. तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असून कारखान्याला आगामी काळात गळीत हंगाम करताना उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गळीतासाठी पुढील वर्षी उसाची कमतरता भासणार असून गळीत कमी होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहेत.
सध्या ऑगस्ट महिना सुरू असला तरी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यातच पावसाळ्यात पाणीटंचाई भेडसावु लागली आहे. गळीत हंगाम वाया गेल्याची स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. यंदा सरासरीच्या अत्यंत कमी प्रमाणात ऊस लागवडी झाल्याचे चित्र दिसून येते.
बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान करतात. पूर्व हंगामी उसाच्या 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत लागवडी करण्यात येतात. आता आडसाली उसाच्या लागवडी संपल्या असून पूर्व हंगामी उसाच्या लागवडी सुरू होणार आहेत. गेल्या वर्षी याच काळात सरासरीच्या 43 टक्के उसाच्या लागवडी झाल्या होत्या. दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. लागवडी केल्यानंतर साधारणपणे 15 ते 17 महिन्यांनी ऊस कारखान्याला तोडणीस दिला जातो. यंदा ऊसाचे आगार असलेल्या पुणे विभागात ऊस लागवडी घटल्याचे चित्र दिसून येते.
मुळातच यंदा अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने त्याचा विपरीत परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. आडसाली उसाची लागवड करत असताना पाऊस नसल्याने ऊसाला पाण्याची कमतरता भासत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी अद्यापही आडसाली उसाची लागवड केली नाही.
-चंद्रकांत ढगे, कार्यकारी संचालक भीमाशंकर साखर कारखाना





