पुणे | खासगी सहभागातून ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचा निर्णय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये अडथळा ठरणाऱ्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे ट्रान्झिट कॅम्प; परंतु ही अडचण सोडविण्यासाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी सहभागातून ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील झोपडपट्ट्यांचे गतीने पुनर्वसन व्हावे, यासाठी प्राधिकरणाने हे पाऊल उचलले आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात एक एकर जागेवर ३०० चौरस फुटांच्या सदनिका बांधून देण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
संबंधित जागा मालकाने तयारी दर्शविल्यास त्याच्या मोबदल्यात जागेचा टीडीआर (हस्तांतरीय विकास हक्क) आणि बांधकामाच्या मोबदल्यात ॲमेनिटी टीडीआर देण्याचा निर्णय घेतला आहे. एक एकर जागेवर तीनशे चौरस फुटाच्या चारशे ते साडेचारशे सदनिका उभा राहतात.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अशा दोन जागांवर सुमारे आठशे ते नऊशे सदनिका उभारण्याचे नियोजन आहे. तसे झाल्यास ट्रान्झिट कॅम्पसाठी सुमारे दोन हजार सदनिका प्राधिकरणाकडे उपलब्ध होणार आहेत.





