Baramati : सोमेश्वर’च्या अध्यक्षपदाचा फैसला गुरूवारी
Baramati : स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नुकत्याच पार पडलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार विकास पॅनल'ने निर्विवाद वर्चस्व मिळवले.

सोमेश्वरनगर : राज्यातील सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा फैसला आता (दि.५) रोजी होणार आहे. कारखान्याच्या नूतन अध्यक्ष निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यानंतर आता अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता पुणे आणि सातारा जिल्ह्याला लागून राहिली आहे.
स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नुकत्याच पार पडलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार विकास पॅनल’ने निर्विवाद वर्चस्व मिळवले. विजयानंतर अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली. अध्यक्ष निवडीचे अंतिम अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवड केवळ कारखान्याच्या कारभारापुरती मर्यादित नसून आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांशीही जोडली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची युवा नेतृत्वाला पसंती, सुनेत्रा पवार यांचे राजकीय गणित, सामाजिक समतोल, सहकार क्षेत्रातील अनुभव या सर्व बाबींचा विचार होण्याची शक्यता आहे.
(दि.५) रोजी सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य कार्यालयातील जिजाऊ सभागृहात अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीत २१ पैकी २१ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवलेल्या पॅनलसमोर आता अध्यक्षपदाचा चेहरा निश्चित करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ‘सोमेश्वर’ला अनुभवी अध्यक्ष मिळणार, युवा नेतृत्वाला संधी मिळणार की ओबीसी चेहऱ्याच्या माध्यमातून नवा राजकीय संदेश दिला जाणार, याचा फैसला होणार आहे.
राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडेंची चर्चा?
अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शिंदे यांना कामकाज, संचालकपदाचा अनुभव आहे. बारामती तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी त्यांनी काम पाहिले आहे. माजी संचालक, दोन टर्म जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांचे नावही चर्चेत आहे. सहकारातील अनुभव, प्रशासनावरील पकड, व्यापक जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या आहेत.
संग्राम सोरटे यांचे वलय कामी येणार?
अध्यक्षपदाच्या शर्यतीत ब वर्ग सोसायटी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले संग्राम सोरटे यांचे नावही जोरदार चर्चेत आले आहे. ओबीसी समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकरीच्या संधी, पतसंस्था व दूध संस्थेच्या माध्यमातून युवक, शेतकऱ्यांचे हित जपले आहे. विविध संस्थांच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास ओबीसी प्रतिनिधित्वाला सहकार क्षेत्रात महत्त्व मिळू शकते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय गणितातही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
युवा संचालका की अनुभवाला प्राधान्य?
अध्यक्षपदाच्या चर्चेत दुसऱ्या टर्मचे युवा संचालक अभिजीत काकडे, ऋषिकेश गायकवाड यांचीही नावे पुढे येत आहेत. बारामती खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले यांच्याही नावाला काहींचा पाठिंबा आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ यांच्या नावाचीही आता चर्चा सुरू आहे. खासदार पार्थ पवार यांच्या युवा नेतृत्वाचा विचार करता तरुण संचालकाला संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र, अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांचाच असणार असल्याने अनुभव, सामाजिक समतोल, आगामी राजकीय समीकरणांचा विचार करूनच अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होईल, असे बोलले जात आहे.





