ठरलं ! केजरीवाल उद्या देणार राजीनामा; दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याविषयी उत्सुकता

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची वेळ निश्चित झाली आहे. ते उद्या (मंगळवार) दुपारी ४.३० वाजता नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांची भेट घेणार आहेत.
त्या भेटीत केजरीवाल राजीनामा सादर करतील. ते पदावरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सुत्रे कुणाकडे जाणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आपचे प्रमुख केजरीवाल नुकतेच तुरूंगाबाहेर आले. त्यानंतर रविवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
ती अनपेक्षित आणि सर्वांनाच चकित करणारी ठरली. आता केलेल्या घोषणेला अनुसरून कृती करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. केजरीवाल यांनी सक्सेना यांच्या भेटीची वेळ मागितली होती. आता त्या भेटीची वेळ ठरली आहे.
जोपर्यंत जनता प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाही; तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही, असा निर्धार केजरीवाल यांनी व्यक्त केला. त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे केजरीवाल यांच्यानंतर आपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. मात्र, जनता म्हणेल तेव्हाच मी मुख्यमंत्री आणि सिसोदिया उपमुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करू, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे सिसोदिया मुख्यमंत्री बनणार नसल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्रिपदासाठी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांच्यासह आतिशी आणि गोपाल राय या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. लवकरच त्याविषयीचा सस्पेन्स संपेल. मात्र, दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे.





