Deccan XI Premier League 2024 : बुल्स, डॉल्फिन संघांना फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद…

पुणे – बुल्स् इलेव्हन आणि डॉल्फिन इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना डेक्कन इलेव्हन क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसर्या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’ फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे १२ आणि ८ वर्षाखालील गटाचे विजेतेपद संपादन केले.
कर्वेनगर येथील सेवासदन शाळेच्या मैदानावर झालेल्या १२ वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीमध्ये बुल्स् इलेव्हनने स्कॉर्पियन्स् इलेव्हनचा २-१ असा पराभव केला. बुल्स इलेव्हनकडून हिमांशु जोशी याने ५ व्या मिनिटाला तर, अद्वैत आपटेने १६ व्या मिनिटाला गोल केले. स्कॉर्पियन्स् इलेव्हनकडून श्रीनिवास नारवेकर याने ९ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान श्रीनिवास नारवेकरला देण्यात आला.
८ वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीमध्ये डॉल्फिन्स् इलेव्हनने बुल्स् इलेव्हनचा २-० असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. डॉल्फिन्स् इलेव्हन संघाकडून लव साबळे याने एक गोल तर, बुल्सच्या एक स्वयंगोलचा फायदा झाला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान बुल्स् इलेव्हन संघाच्या विवान साळुंखे याला मिळाला.
पारितोषिक वितरण भारतीय रोल बॉल संघाचा कर्णधार आदित्य गणेशवडे, वैदेही वैद्य, डॉ. पृथ्वीराज पायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदार ताम्हाणे, अविनाश अदीगे, राजेश भोसले, अनिल देशपांडे, सुनिल देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.





