तब्बल 15 वर्षे कोमात असलेल्या महिलेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका बसलेली ‘फखरा अहमद’, नेमकं काय घडलं, पाहा….

इस्लामाबाद – डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला तब्बल 15 वर्षे कोमात राहावे लागले आहे आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. ‘फखरा अहमद’ असे या महिलेचे नाव असून ती पाकिस्तानातील आहे. 2009 मध्ये फखरा अहमदला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यादरम्यान ती कोमात गेली होती. दोन दिवसांनी फखराच्या बाळाचाही रुग्णालयातच मृत्यू झाला होता. फखराची सामान्य प्रसूती होणार होती, पण तिला ‘ॲनेस्थेटिक इंजेक्शन’ देण्यात आले होते. त्यासाठी फखराकडून परवानगी घेण्यात आली नव्हती.
या घटनेची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तिखार मुहम्मद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्वत:हून दखल घेतली आणि सदरील मृत्यूची चौकशी केली असता, फखरा अहमदचा मृत्यू हा एका खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं उघड झालं.
फखरा अहमद कोमात जाण्याआधी एका बँकेत नोकरी करत होत्या आणि त्यांचे बरेच शोधनिबंध देखील प्रकाशित झाले होते. जेव्हा फखरा प्रसूतीसाठी त्यांच्या घरी आल्या होती, तेव्हा देखील ती एक शोधनिबंध लिहीत होती आणि तो पोस्टाने पाठवून देण्यास तिने सांगितलं होतं.
चार भावंडांमध्ये सर्वात मोठी असलेली फखरा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेत नोकरीला असताना फखरा उच्चशिक्षण घेत होती आणि ज्या मुलांना बँकर बनायची इच्छा असलेल्या मुलांना शिकवण्याचं कामही ती करत होती. कोमात असलेली व्यक्ती काहीही प्रतिसाद देऊ शकत नाही, परंतु फखराची काळजी घेत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नमूद केलं की ‘कधीकधी ती एका बाजूला बराच वेळ पडून राहिल्यास तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असत.
2009 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इफ्तिखार हुसेन कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय तपास समिती स्थापन करण्यात आली होती, ज्या समितीने अहवालात लिहिले होते “स्त्रीरोग तज्ञाने दुसऱ्या डॉक्टरांना बोलावण्यात बराच वेळ वाया घालवला आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णाच्या मेंदूचे गंभीर नुकसान झाले.”
जेव्हा फखरा कोमात गेली तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की ती कुणाचीतरी वाट बघत आहे. तिच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं तिला माहीत नव्हतं. फखराचे वडील काझी इस्माईल ताहिर म्हणतात की, “आम्ही असे म्हणत नाही की सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी निष्काळजीपणा करतात.
पण लक्षात या व्यवसायात निष्काळजीपणा आणि चुकांना जागा नाही हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आमची 15 वर्षांची कहाणी देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ऐकावी अशी आमची इच्छा आहे जेणेकरून भविष्यात आमच्या कुटुंबाला ज्या वेदना आणि दु:खाला सामोरे जावे लागले आहे ते इतर कुणाच्याही नशिबी येऊ नये.”





