बारामती -पणदरे (ता. बारामती) येथील पवईमाळ वस्तीवरील संक्रमित 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बारामतीतील करोनाचा हा पाचवा बळी ठरला.
तालुक्यातील पणदरे येथील पवईमाळ येथे एका महिलेस करोनाची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले होते. काल एकूण 38 स्वॅब नमुने घेतले होते. त्यापैकी 37 स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून पवईमाळ येथील एक 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आलेली आहे.
महिलेला त्रास होत असल्यामुळे तिला खासगी दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालय रूई येथे आणण्यात आले होते. आज श्वसनाचा त्रास वाढल्यामुळे करोना संक्रमित महिलेचा मृत्यू झाला. शहर व तालुक्यात आतापर्यंत पाच संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बारामती शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेले तीन दिवसांपासून बारामती शहरात टाळेबंदी आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.