Senior Citizen Death: एकटेपणाचा वेदनादायी शेवट! घरात ३ दिवस पडून राहिला मृतदेह; सिंगापूरहून मुलगा आल्यानंतर अंत्यसंस्कार
Senior Citizen Death: पोलीस प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन; एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी 'भरोसा सेल' आणि १०९० हेल्पलाईनवर करावी नोंदणी.

Senior Citizen Death : रेंज हिल्स परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय निवृत्त शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. मुसळधार पावसामुळे सलग दोन दिवस घरकाम करणारी महिला येऊ शकली नाही. त्यामुळे मृतदेह तब्बल तीन दिवस घरातच पडून राहिला. सिंगापूरमध्ये राहणारा मुलगा पुण्यात आल्यानंतर मृत्यूच्या पाचव्या दिवशी, शनिवारी (११ जुलै) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचे सुमारे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्या रेंज हिल्स येथील फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा व सून सिंगापूरमध्ये वास्तव्यास असून मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. मुसळधार पावसामुळे घरकाम करणारी महिला सलग दोन दिवस कामावर येऊ शकली नव्हती. तिसऱ्या दिवशी ती घरी आल्यानंतर वारंवार दरवाजाची बेल वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
शेजाऱ्यांनीही महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सिंगापूरमध्ये असलेल्या मुलाशी संपर्क साधला. मुलाने ई-मेलद्वारे घराचा दरवाजा तोडण्यास परवानगी दिल्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांच्या उपस्थितीत फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महिला मृतावस्थेत आढळून आल्या.
मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात सुमारे तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच मुलगा सिंगापूरहून पुण्याकडे रवाना झाला. दोन दिवसांनंतर तो पुण्यात पोहोचल्यानंतर शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत काही नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अमेरिकेत वास्तव्यास असलेली मुलगी काही कारणास्तव पुण्यात येऊ शकली नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना स्थानिक पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’मध्ये स्वतःची माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुलांचे व जवळच्या नातेवाईकांचे संपर्क क्रमांक शेजाऱ्यांकडे उपलब्ध ठेवावेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने संपर्क साधता येईल. यासाठी १०९० हेल्पलाइनचाही वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.




