जिवंतपणीच बनवला मृत्यूचा दाखला; तरुणाच्या प्रतापाने पोलिसही चक्रावले

मालेगाव (नाशिक) : नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने जीवंत असतानाच स्वत:च्याच मृत्यूचा दाखल तयार करून घेतला आहे. आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, न्यायालयाने दोघांना ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकारामुळे पुन्हा मालेगावचे नाव राज्यभर चर्चेत आले.
मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर (वय ३०, रा. रसूलपुरा) असं बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद सुफियान व त्याचा साथीदार मन्सूर अहमद सिराज अहमद (४१, रा. खुशामतपुरा) या दोघांना शनिवारी (ता. ८) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका बचत गटाकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाचे पैसे बुडवण्यासाठी त्याने हा प्रताप केला आहे. जिवंतपणीच त्याने स्वतःच्या मृत्यूचा दाखला बनवला. एका मित्राच्या मदतीने त्याने हा दाखला दाखवत कर्जातून मुक्तता करून घेतली. यानंतर पोलिसांनी घटनेची पडताळणी करून जिवंत असताना मृत्यूचा दाखला बनवणाऱ्या तरूणासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
याविषयी एका अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे पोलिसांना माहिती दिली तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपाधीक्षक गुंजाळ यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बचतगटाचे कर्ज चुकविण्यासाठी काढले प्रमाणपत्र
मोहम्मद सुफियान याच्याकडे बचतगटाचे कर्ज होते. एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यानंतर बचत गटाचे कर्ज माफ होते, असे त्याला कुणीतरी सांगितल्याने त्याने हा प्रकार केल्याचे तपासाधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी पत्रकारांना सांगितले. केवळ बचतगटाचे कर्ज चुकविण्यासाठी मोहम्मद सुफियानने चक्क स्वत:चाच मृत्यू झाल्याचे दाखवून हे प्रमाणपत्र काढल्याने राज्यभर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.





