‘लाडक्या बहिणी’ कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड’; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील दोन्ही आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीने सभा घेण्यास सुरुवात केली आहे. महायुतीकडून योजनांची घोषणा केली जात आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा करण्यात आली असून यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा फायदा त्यांना नक्कीच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशात भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेले एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. एका सभेत ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे’, असं वक्तव्य भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी एका सभेत बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोट उठवली.
अखेर महायुतीची भानगड पुढे आली!
महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे.
भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. pic.twitter.com/EL6d0Jc6vW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 24, 2024
त्यांच्या सभेतील व्हिडिओ आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत टीका केली आहे. अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. यावर आता टेकचंद सावरकर आपली बाजू मांडली आहे.
ते म्हणाले,’एका मेळाव्यातील माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला. माझा असा कोणताही उद्धेश नव्हता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे. मी एकट्याने काही म्हटलं तर काहीही होणार नाही. सुनील केदार यांनी दोन दिवसांपूर्वी या योजनेबाबत बोलताना म्हटलं होतं की, माझं सरकार आलं तर मी पहिलं काम कोणतं करेन तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचं काम करेन, असं सुनील केदार म्हणाले होते. आता खरं तर काँग्रेसकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे काँग्रेसने माझ्या भाषणाची तेवढीच क्लिप व्हायरल केली”, असं आमदार टेकचंद सावरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.





