पिंपरी | लाडकी बहिण, भावाच्या योजनेच्या लाभार्थींनी कोठून रक्कम देणार ?

पिंपरी, (प्रतिनिधी) – महायुती सरकारची ‘लाडकी बहिणी आणि लाडका भाऊ’ ही योजनाच मुळात फसवी आहे. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांची घोषना केली आहे. बार्टी व अन्य संस्थांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यासाठी पैसे नसताना आता या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. लाभार्थींना कोठून लाभाची रक्कम देणार? असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रूपये तर डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची रक्कम स्टायपंड म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
परंतु, या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे सरकार एवढा मोठा निधी कुठून आणणार? हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. मुळात महाराष्ट्राचे कर्ज सातत्याने वाढत असताना तरुणांना पगार कुठून मिळणार? तरुणांना प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड देण्याची योजना पूर्वीपासूनच सुरु आहे.असेया पत्रकात नमूद केले आहे.
वास्तविक पाहता बार्टी, सारथी आणि हाज्योती या संस्थांच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. फेलोशिपची रक्कम मिळावी याकरिता या विद्यार्थ्यांनी पुणे ते मुंबई असा पार्यी मोर्चा काढला आहे. या विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही. मग या नव्या लाभार्थ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेची पूर्तता कशी करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.





