वाहनधारकांना दिलासा..! HSRP नंबरप्लेटसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५ आणि नंतर १५ ऑगस्ट २०२५ अशी मुदत देण्यात आली होती. आता पुन्हा मुदतवाढ देत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP नंबरप्लेट बसवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परिवहन विभागाने ही मुदतवाढ देण्यामागे अनेक कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. HSRP बसवण्यातील प्रलंबित प्रक्रिया, फिटमेंट केंद्रांवरील नियुक्ती उपलब्धतेत विलंब, ग्रामीण भागातील केंद्रे उशिरा सुरू होणे, काही केंद्रे बंद होणे आणि नागरिकांच्या सततच्या मागण्या यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व अडचणी लक्षात घेता, वाहनधारकांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
कठोर कारवाईचा इशारा
राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट निर्देश दिले आहेत की, “१ डिसेंबर २०२५ पासून विशेष अंमलबजावणी पथके HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करतील. मात्र, ज्या वाहन मालकांनी ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी फिटमेंटसाठी अपॉइंटमेंट निश्चित केली असेल, त्यांना त्यांच्या नियोजित तारखेपर्यंत कारवाईतून सूट मिळेल.” यामुळे वाहनधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत संधी आहे, परंतु त्यानंतर कोणतीही सवलत मिळणार नाही.
HSRP नसल्यास काय होणार?
परिवहन विभागाने HSRP नसलेल्या वाहनांवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. सध्या अशा वाहनांच्या मालकी हस्तांतरण आणि गहाणखत बदल यासारख्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. १ डिसेंबर २०२५ पासून पुनर्नोंदणी, वाहन सुधारणा मंजुरी आणि परवाना नूतनीकरण यासारख्या सेवांवरही बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, तपासणीदरम्यान ताब्यात घेतलेली वाहने HSRP प्लेट बसवल्याशिवाय सोडली जाणार नाहीत. यामुळे वाहनधारकांना मुदतीपूर्वी HSRP बसवणे बंधनकारक आहे.





