DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

DC vs GT Gujarat Titans beat Delhi Capitals by 10 wickets : साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांच्यातील विक्रमी भागीदारीच्या जोरावर, गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवत प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. गुजरातच्या विजयसाह आरसीबी आणि पंजाब किंग्जही प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता चौथ्या स्थानासाठी तीन संघांत स्पर्धा आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर २०० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातने साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर एकही विकेट्स न गमावता ऐतिहासिक विजय नोंदवला.
साई सुदर्शन आणि शुबमन गिलची विक्रमी भागीदारी –
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातने चांगली सुरुवात केली, साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी शेवटपर्यंत लय कायम ठेवली. दोघांमध्ये २०५ धावांची नाबाद भागीदारी झाली. कोणत्याही सलामी जोडीने केलेली ही तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. याआधी, गिल आणि सुदर्शन यांनी आयपीएल २०२४ मध्ये २१० धावांची भागीदारी केली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. साई सुदर्शनने ६१ चेंडूत १०८ (१२ चौकार, ४ षटकार) धावांची नाबाद खेळी केली, तर शुबमन गिलने ५३ चेंडूत ९३ (७ षटकार, ३ चौकार) धावा केल्या. दिल्लीला हरवून गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. सुदर्शनने षटकार मारून गुजरातला प्लेऑफचे तिकीट मिळवून दिले.
Game sealed ✅
Playoffs booked ✅An unbeaten 2️⃣0️⃣5️⃣-run partnership between Sai Sudharsan & Shubman Gill does the job for #GT 💙
Updates ▶ https://t.co/4flJtatmxc #TATAIPL | #DCvGT | @gujarat_titans pic.twitter.com/Uz3ZdMTy0X
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
केएल राहुलच्या शतकी खेळीवर फेरलं पाणी –
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ३ गडी गमावून १९९ धावा केल्या होत्या. केएल राहुलने संघासाठी शानदार फलंदाजी केली आणि नाबाद शतक झळकावले. राहुलने ६५ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी केली. राहुलने त्याच्या खेळीदरम्यान १४ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच वेळी, अभिषेक पोरेलने १९ चेंडूत ३० धावा केल्या. कर्णधार अक्षर पटेलने १६ चेंडूत २५ धावा फटकावल्या, तर शेवटच्या षटकात ट्रिस्टन स्टब्सने १० चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा फटकावल्या.
१ स्थानासाठी ३ संघांत स्पर्धा चुरस –
आता फक्त एकच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो आणि या स्थानासाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे. दिल्ली व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पण यापैकी फक्त एकाच संघाला प्लेऑफचे तिकीट मिळू शकेल. मुंबई सध्या १२ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली १२ सामन्यांत १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि लखनौ ११ सामन्यांत १० गुणांसह सातव्या स्थानावर आहे.





