Dawood Ibrahim Land : ‘दाऊद’ला राज्यात मोठा झटका! ‘या’ जमिनीचा अखेर लिलाव; दहशतीवर मात करत दोन खरेदीदारांची बाजी
Dawood Ibrahim Land : दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील खेड येथील जमिनीचा यशस्वी लिलाव झाला आहे.

Dawood Ibrahim Land : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या विरोधात केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेली दाऊदची वडिलोपार्जित जमिनीचा अखेर लिलाव करण्यात आला आहे.
नेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा व्यवहार पूर्ण झाला असून, दोन खरेदीदारांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. दाऊद इब्राहिमच्या या मालमत्तांचा लिलाव यापूर्वीही अनेकदा पुकारण्यात आला होता. मात्र, दाऊदच्या दहशतीमुळे आणि संभाव्य धोक्यामुळे कोणीही ही जमीन खरेदी करण्यास धजावत नव्हते.
वारंवार लिलाव प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने या जमिनी पडून होत्या. परंतु, यावेळी केंद्र सरकारने कडेकोट बंदोबस्त आणि गोपनीयतेचे आश्वासन दिल्याने दोन जण पुढे आले आणि त्यांनी यशस्वी बोली लावून या जमिनी आपल्या नावावर केल्या आहेत.
या व्यवहारामुळे दाऊदचा त्याच्या मूळ गावाशी असलेला जमिनीचा संबंध आता अधिकृतपणे संपुष्टात आला आहे. रत्नागिरीतील मुंबके गाव हे दाऊद इब्राहिमचे मूळ गाव आहे. तिथे त्याच्या मालकीच्या शेतजमिनी आणि काही जुन्या वास्तू होत्या. या मालमत्ता जप्त केल्यानंतर सरकारने त्या विकण्याचा निर्णय घेतला होता.
लिलावात विकल्या गेलेल्या या जमिनींमधून मिळणारा पैसा सरकारी तिजोरीत जमा होणार आहे. यापूर्वी दाऊदची मुंबईतील रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि इतर मालमत्तांचाही लिलाव करण्यात आला होता, मात्र रत्नागिरीतील जमिनीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.





