David Warner Slam Captains : ‘मला वाटतयं इथं शाळेतील मुलांसोबत बसलोय…’, PSL च्या प्रेसमध्ये डेव्हिड वॉर्नरने कर्णधारांना झापलं, पाहा VIDEO
David Warner Slam Captains : पीएसएल कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.

David Warner Slam PSL captains in press conference : पाकिस्तानमध्ये गुरुवारी सुरू होणाऱ्या ‘पाकिस्तान सुपर लीग’ला (PSL) एकामागून एक धक्के बसत आहेत. इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व इंधन संकटामुळे संपूर्ण पाकिस्तान ठप्प झाला असून, याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. याच दरम्यान झालेल्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.
डेव्हिड वॉर्नरचा पारा चढला!
कराची किंग्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना शाहीन आफ्रिदी, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांसारखे इतर कर्णधार आपापसात कुजबूज करत हसत होते. खेळाडूंचा हा बालिशपणा पाहून वॉर्नर संतापला आणि बोलता बोलता अचानक थांबला. तो म्हणाला, “काय सुरू आहे? सॉरी जेंटलमेन, मला वाटतं आपण इथे शालेय मुलांमध्ये बसलो आहोत.” वॉर्नरच्या या विधानाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी नाचक्की झाली आहे.
“Oh… sorry! Looks like we’ve got some school kids in here!’ — David Warner’s hilarious comment during the captains’ press conference #TOKSports #DavidWarner #KarachiKings #PSL11 pic.twitter.com/sVP0y1czUo
— TOK Sports (@TOKSports021) March 25, 2026
रिकामे स्टेडियम आणि ‘पेट्रोल शॉर्टेज’ –
पाकिस्तानमध्ये इंधनाची मोठी टंचाई असल्याने सरकारने शाळा-महाविद्यालये बंद ठेवली असून लोकांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पीसीबीने सर्व सामने प्रेक्षकांशिवाय ‘रिकाम्या स्टेडियममध्ये’ खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ‘आइसलँड क्रिकेट’ने ट्विट करत पीएसएलचा उल्लेख ‘पेट्रोल शॉर्टेज लीग’ असा करत मज्जा घेतली आहे. इंधन बचतीसाठी ६ ऐवजी आता फक्त लाहोर आणि कराची या दोनच शहरांत सामने होतील.
उद्घाटन सोहळाही रद्द –
२६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही रद्द करण्यात आला आहे. पहिला सामना गतविजेता लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन यांच्यात रंगणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पीएसएलचा करार मोडून आयपीएलमध्ये खेळण्याला पसंती दिल्याने या स्पर्धेच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ३ मे पर्यंत चालणाऱ्या या लीगमध्ये पाकिस्तान सरकार आणि बोर्डाला आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागणार आहे.





