Warner Drink Drive : बॉल-टेम्परिंगनंतर डेव्हिड वॉर्नर पुन्हा मोठ्या संकटात! ९ महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?
Warner Drink Drive : २१ जुलै रोजी सिडनीच्या व्हेवरली लोकल कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान डेव्हिड वॉर्नरने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे.

David Warner Drunk Driving Case Australia Sydney Court : ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) पुन्हा एकदा एका मोठ्या वादात अडकला असून, त्याला तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) दरम्यान सुट्टीवर सिडनीला परतलेल्या वॉर्नरला दारू पिऊन बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी (Drink and Drive) पोलिसांनी रंगेहात पकडले होते. याप्रकरणी २१ जुलै रोजी सिडनीच्या व्हेवरली लोकल कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान वॉर्नरने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. आता १८ ऑगस्ट रोजी कोर्ट या प्रकरणावर आपला अंतिम निकाल आणि शिक्षेची घोषणा करणार आहे.
रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मर्यादेपेक्षा दुप्पट!
ही घटना ५ एप्रिल रोजी सिडनीच्या पूर्व भागात घडली होती. ‘क्रिकइन्फो’च्या अहवालानुसार, वॉर्नरला मारौब्रा पोलीस ठाण्यात दुसऱ्या चाचणीसाठी नेले असता, त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण ०.१०४ आढळले. हे रक्तातील अल्कोहोलच्या कायदेशीर मर्यादेपेक्षा दुप्पट होते. वॉर्नरच्या वकिलांनी कोर्टात गुन्हा मान्य केल्याची माहिती दिली. या गंभीर गुन्ह्यासाठी वॉर्नरला किमान ६ महिन्यांच्या ड्रायव्हिंग बंदीसह २२०० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड आणि जास्तीत जास्त ९ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
‘सिडनी थंडर’चे कर्णधारपद धोक्यात!
🚨 REPORTS 🚨
Former Australian star batter David Warner has pleaded guilty to a drink-driving charge following an incident in April this year.
His captaincy of the Sydney Thunder is now in doubt for the upcoming BBL season.#DavidWarner #Australia #Sportskeeda pic.twitter.com/f7bNoMhi9l
— Sportskeeda (@Sportskeeda) July 22, 2026
गुन्हा कबूल केल्यानंतर आता बिग बॅश लीगमध्ये (BBL) सिडनी थंडरचे (Sydney Thunder) कर्णधारपद वॉर्नरच्या हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट न्यू साउथ वेल्सचे मुख्य कार्यकारी ली जर्मन यांनी यावर चिंता व्यक्त करत, “आम्ही सुरक्षित ड्रायव्हिंगचे समर्थन करतो, ड्रिंक अँड ड्राईव्हचे नाही,” असे स्पष्ट केले.
२०१८ च्या ‘बॉल टेम्परिंग’ प्रकरणानंतर वॉर्नरवरील नेतृत्वाची बंदी हटवून त्याला २०२४ मध्ये थंडरचे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, आता या नव्या वादामुळे त्याचे क्रिकेट करिअर आणि स्वातंत्र्य दोन्ही धोक्यात आले आहे.





