David Warner Fight : डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अलीमध्ये जुंपली? भर मैदानात बाचाबाची झाल्याचा VIDEO व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं?
David Warner fight : कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अनुभवी अष्टपैलू मोईन अली यांच्यात बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,

David Warner Fight with Moeen Ali Viral Video : पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ च्या हंगामात मैदानातील थरारासोबतच मैदानाबाहेरील एका कथित वादाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. कराची किंग्स संघाने रावळपिंडीवर विजय मिळवल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अनुभवी अष्टपैलू मोईन अली यांच्यात बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यावर आता खुद्द वॉर्नरने स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय?
गद्दाफी स्टेडियमवर २ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात कराची किंग्सने रावळपिंडीचा ५ गडी राखून पराभव केला. मात्र, या विजयानंतर कराचीच्या गोटातून एक १४ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नर अत्यंत रागात मोईन अलीच्या दिशेने जाताना दिसला. वॉर्नरचे हावभाव पाहून तो मोईनवर प्रचंड चिडल्याचे वाटत होते. इतकेच नाही तर संघाचे डायरेक्टर हैदर अजहर हे वॉर्नरला शांत करून बाजूला नेण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसले. यामुळे चाहत्यांमध्ये दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये बिनसल्याची चर्चा सुरू झाली.
वॉर्नरने सांगितलं वादामागचं सत्य!
What was the conversation going on here @HaiderAzhar 😅,
Good win Alhamdu Lillah, No one can stop us this Season in Sha Allah👌 pic.twitter.com/oRhNBPubws
— SheR•ALI (@Sher__Ali) April 2, 2026
सोशल मीडियावर या व्हिडिओवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर डेव्हिड वॉर्नरने स्वतः ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत या प्रकरणावर पडदा टाकला. वॉर्नरने स्पष्ट केले की, तो हैदर अजहरला आधी जाऊन प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन (Handshake) करण्यास सांगत होता. दरम्यान, हैदर अजहर यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “व्हिडिओत जे दिसत आहे ते सत्य नाही. ते दोघेही माझीच थट्टा करत होते. संघात कोणतेही मतभेद नसून सर्व काही आलबेल आहे.”
आझम खानने मिळवून दिला विजय –
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, १९८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने दमदार अर्धशतक ठोकून पाया रचला. त्यानंतर आझम खानने अवघ्या ३४ चेंडूंत ७४ धावांची (६ चौकार, ६ षटकार) वादळी खेळी करत ४ चेंडू राखून कराचीला विजय मिळवून दिला. विजयानंतर खेळाडूंच्या मस्करीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.





