Pune District : दूध भेसळीच्या चर्चेने दौंड तालुका हादरला
Pune District : संबंधित पावडर दुधात मिसळल्यानंतर दुधाचा घट्टपणा वाढतो. दूध तपासणीतील फॅट, लॅक्टो किंवा इतर मोजमापांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

खुटबाव : दैनिक प्रभातमध्ये दूध भेसळीप्रकरणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर दौंड तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. दुधात वापरल्या जाणाऱ्या कथित रासायनिक पावडरीच्या स्रोताबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही पावडर दौंड तालुक्यातील औद्योगिक टापूतील एका कंपनीत तयार केली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, संबंधित पावडरीच्या पॅकिंगवरील मुदत संपल्याचे दिसून येत असल्याची माहिती समोर येत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
दौंड तालुक्यात ज्या ठिकाणी दूध डेअरी व दूध प्रक्रिया प्लांट आहेत, त्या ठिकाणी दुधातील घटकांचे प्रमाण, विशेषतः लॅक्टोजॅट किंवा संबंधित मापदंड नियंत्रित ठेवण्यासाठी अशा पावडरीचा वापर केला जात असल्याची चर्चा दूध व्यवसायाशी संबंधित वर्तुळात सुरू आहे. मात्र, या पावडरीचा नेमका रासायनिक घटक कोणता, ती अन्नपदार्थांमध्ये वापरण्यास अधिकृत आहे का, तिची वैधता किती आहे आणि मुदत संपल्यानंतर तिचा वापर होत आहे का, याबाबत अधिकृत तपासणी होणे गरजेची आहे.
संबंधित पावडर दुधात मिसळल्यानंतर दुधाचा घट्टपणा वाढतो. दूध तपासणीतील फॅट, लॅक्टो किंवा इतर मोजमापांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे नैसर्गिक दुधाऐवजी रासायनिक पदार्थांचा वापर करून दुधाची गुणवत्ता कृत्रिमरीत्या कायम ठेवली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पावडरीचे नमुने तातडीने ताब्यात घेऊन त्यांची अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुदत संपलेली पावडर?
हवेली आणि दौंडच्या सीमेवरील एका संबंधित कंपनीतून पावडरीची होणारी वाहतूक, ती कोणत्या डेअरी किंवा दूध प्रक्रिया केंद्रांना पुरवली जाते. तिचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे संबंधित पावडरीची मुदत संपलेली दिसून येत आहे. आरोग्याशी संबंधित हा विषय असल्याने केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी, नमुने संकलन, प्रयोगशाळा अहवाल आणि त्यानंतरची कारवाई याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





