Daund FDA Raid : दौंडमध्ये एफडीएचा मोठा दणका! गुऱ्हाळघरांवर छापा टाकत लाखांचा गुळ-साखरेचा साठा जप्त
Daund FDA Raid : दौंड तालुक्यातील गुऱ्हाळघरांवर कारवाई करत सुमारे १७ लाख ७९ हजार रुपयांचा माल प्रशासनाच्या ताब्यात; जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत रवाना.

Daund FDA Raid – दौंड तालुक्यातील गुळ उत्पादन व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गुळ व साखरेचा साठा जप्त केला आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान उत्पादन प्रक्रियेतील अनियमितता, अस्वच्छता आणि परवाना नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सहजपूर, बोरीपारधी, खामगाव फाटा आणि परिसरातील गूळ उत्पादन केंद्रांची अचानक तपासणी केली. यावेळी काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतेच्या निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
तपासणीत संशयास्पद वापरासाठी ठेवलेली साखर तसेच मोठ्या प्रमाणातील गुळाचा साठा जप्त करण्यात आला. एकूण १६.६५ टन गूळ आणि २० टन साखर, असा सुमारे १७ लाख ७९ हजार रुपयांचा माल प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या उत्पादनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची माहिती नागरिकांनी प्रशासनाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही कारवाई सह आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.
दौंड तालुक्यात भेसळीत कोटींची उलाढाल
दौंड तालुक्यात गुऱ्हाळघरांची संख्या सुमारे १०० ते १२५ आहे. ही गुऱ्हाळघरे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. गुळ तयार करण्यासाठी सरपणाचा वापर हा घातक ठरत आहे. परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने गावकऱ्यांनी आवाज उठविला आहे. त्यानंतर सुमारे १०० ते १५० गुऱ्हाळचालकांनी आपले बस्तान शिरूर तालुक्यात हलविले आहे. या भेसळीतून महिन्याकाठी कोटींची उलाढाल होत आहे.




