Ketan Agrawal Case : मुलीच्या कृत्याने मोठा धक्का; वडिल ICU मध्ये दाखल, आईची संतप्त प्रतिक्रिया म्हणाल्या “तिलाही…”
Ketan Agrawal Case : मुलीच्या कृत्याने सिया गोयलच्या आई आणि वडिलांना मोठा धक्का बसला असून, तिचे वडिल प्रवीण गोयल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Ketan Agrawal Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असून त्याची वेगवेगळ्या बाजूंनी पडताळणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
पोटच्या पोराला गमावल्यानंतर केतनचे आई वडिल आणि संपूर्ण कुटुंबच मोठ्या धक्क्यातून जात आहे. दुसरीकडे आपल्या मुलीच्या कृत्याने सिया गोयलच्या आई आणि वडिलांना मोठा धक्का बसला असून, तिचे वडिल प्रवीण गोयल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पूजा गोयल म्हणाल्या….
या प्रकरणी आता सियाची आई आणि वडिल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या गुन्ह्यात जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका या दोघांनी घेतली आहे. सिया गोयलची आई पूजा गोयल म्हणाल्या, “या प्रकरणात माझ्या मुलीचा दोष सिद्ध झाला, तर तिलाही केतनला ज्या ठिकाणाहून लोहगडाच्या दरीत ढकलण्यात आले, त्याच ठिकाणाहून ढकलावे. कायद्याने तिला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
प्रवीण गोयल म्हणाले…
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही मुलीची बाजू न घेता न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. “या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. केतनच्या कुटुंबीयांना सियाच्या वागणुकीबाबत काही माहिती होती, तर त्यांनी आम्हाला आधी सांगायला हवे होते. आम्ही आमच्या मुलीला समजावले असते, तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Water Leakage: विद्यापीठ चौकात लाखो लीटर पाणी वाया! महापालिकेचा भोंगळ कारभार उघड
यावेळी प्रवीण गोयल यांनी चेतन चौधरीबाबतही महत्त्वाचा खुलासा केला. “मी आजपर्यंत चेतन चौधरीला कधी पाहिले नाही. त्याच्याशी माझी कधी भेट झाली नाही किंवा संवादही झाला नाही. तो आमच्या घरी कधी आला नव्हता. सियाच्या तोंडूनही आम्ही त्याचे नाव कधी ऐकले नव्हते,” असे प्रवीण गोयल यांनी सांगितलं.
अग्रवाल कुटुंब खूप चांगले
केतन अग्रवालच्या कुटुंबाविषयी बोलताना त्यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “अग्रवाल कुटुंब अत्यंत चांगले आणि संस्कारी आहे. आमचे त्यांच्याशी अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध होते. या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही केवळ एका चांगल्या कुटुंबाशी नाते गमावले नाही, तर एका मुलालाही गमावले आहे. यापेक्षा अधिक मला काही बोलायचे नाही,” असे ते म्हणाले.
मुख्य सूत्राधार असल्याची कबुली
दरम्यान, केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी त्याची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर लोहगड किल्ल्यावरुन सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, चौकशीत या कटाचा मुख्य सूत्रधार स्वतःच असल्याचं सियानं कबूल केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर या कटासाठी मोठी प्लॅनिंग करण्यात आली होती. केतन आणि सिया एकत्रित लोहगडावर गेल्यानंतर त्यानंतर तिथे चेतन आला. हे सर्व आधीच ठरवण्यात आले होते.
हेही वाचा : PMC News: सात कोटींचं काम थेट २० कोटींवर! कोथरूडच्या बालनाट्यगृहाचा अजब कारभार; ११ वर्षे झाली तरी काम संपेना





