गुवाहाटी – आसामचे माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांच्या एकुलत्या एका मुलीने आत्महत्या केली आहे. तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. २००६ मध्ये भृगु कुमार फुकन यांचे निधन झाले आहे. त्यांची २८ वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. रविवारी गुवाहाटीतील खारघुली भागात उपासना फुकन (२८) हिने तिच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. घटनेनंतर लगेचच तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी उपासनाला मृत घोषित केले. आम्ही अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ती बऱ्याच काळापासून मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होती. उपासना यावर उपचार घेत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, उपासनाने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी आई घरकामात व्यस्त होती. संधी पाहून उपासनाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. १९८५ मध्ये आसाम गण परिषदेच्या (एजीपी) पहिल्या सरकारमध्ये उपासनाचे वडील भृगु कुमार फुकन गृहमंत्री झाले. आसाम कराराच्या स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये भृगु कुमार फुकन यांचाही समावेश होता. आसामचे कृषी मंत्री आणि एजीपी अध्यक्ष अतुल बोरा यांनी उपासना फुकन यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुःखाच्या वेळी मी शोकसंतप्त कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.