Dattatray Bharne – दादांचा विचार हा केवळ आठवण नाही, तो विकासाचा मार्ग आहे. जनतेने आज त्या विचारांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, अशा भावनिक शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोरी (१३९) पंचायत समिती मतदारसंघातून विजयी ठरलेल्या श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.बोरी मतदारसंघातून श्रीराज भरणे यांनी तब्बल १०, ९४४ मते मिळवत भाजपचे उमेदवार सचिन पोपट धापटे यांचा ९, ७९८ मतांनी पराभव केला. या विजयामुळे बोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा गड अधिक मजबूत झाला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, तालुक्याच्या जनतेने नेहमीच भाषणांपेक्षा कामाला महत्त्व दिलं आहे. कोण बोलतो यापेक्षा कोण काम करतो, हे मतदारांनी आज पुन्हा सिद्ध केले. श्रीराज भरणे यांचा हा विजय म्हणजे दादांच्या विचारांचा, विकासाच्या बांधिलकीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. कोणत्याही सभा, गाजावाजा किंवा आक्रमक प्रचाराशिवाय जनतेने भरभरून मताधिक्य दिले. हे तालुक्याच्या राजकीय जाणिवेचे द्योतक आहे.दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आजही जनतेच्या मनात जिवंत आहे. हा कौल म्हणजे दादांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. विकास कोण करू शकतो, हे जनतेला चांगलं माहिती आहे,असे भावनिक उद्गार भरणे यांनी काढले. दरम्यान, विजयानंतर प्रतिक्रिया देताना श्रीराज भरणे म्हणाले, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड कामातूनच करेन. हा विजय माझा नसून बोरी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि मतदाराचा आहे. “इंदापूर तालुक्याचा कौल पाहता पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल. याबाबत कोणतीही शंका नाही. कोणावरही टीका-टिप्पणी न करता केवळ विकासाच्या माध्यमातूनच पुढील वाटचाल केली जाईल.” – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री