Dattatray Bharne : इंदापुरात वादळाचा हाहाकार! शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले, मंत्री दत्तात्रय भरणे थेट घटनास्थळी
Dattatray Bharne : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अकलूज नाका परिसराची पाहणी; २४ तासांत गाळे पूर्ववत करण्याचे पालिकेला आदेश.

Dattatray Bharne – शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. ५) झालेल्या वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अकलूज नाका परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याशेजारील शॉपिंग सेंटरचे पत्रे उडून गेल्याने अनेक गाळेधारकांचे नुकसान झाले. काही वाहनांचेही नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि. ६) घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
भरणे यांनीसांगितले, आपत्तीच्या काळात प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पाहणीवेळी इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, तहसीलदार जीवन बनसोडे, कृषी अधिकारी दीपक गरगडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, तलाठी पोळ,
अतिक्रमण विभागाचे ज्ञानेश्वर तिकोंडे, पाणीपुरवठा विभागाच्या रश्मी बारस्कर, नगर परिषदेचे गटनेते शकील सय्यद, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, पोपट शिंदे, उमेश मखरे, सागर आरगडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल राऊत, अजिंक्य जावीर यांच्यासह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
” नैसर्गिक आपत्तीमुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान ही गंभीर बाब आहे. नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये, हा शासनाचा आणि प्रशासनाचा प्राथमिक उद्देश आहे. मी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. ज्या गाळ्यांचे नुकसान झाले आहे ते २४ तासांच्या आत पूर्ववत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही व्यापाऱ्याला अथवा नागरिकाला अडचणीत सोडले जाणार नाही.”
– दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री





