Dattatray Bharne : सहकारी कारखाना टिकला तरच आपले प्रपंच टिकतील; खासगी कारखान्यांच्या आव्हानावर दत्तात्रय भरणेंचा इशारा
Dattatray Bharne : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा माजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सपत्नीक गौरव.

Dattatray Bharne – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सेवापूर्तीबद्दल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. सर्व सेवानिवृत्तांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृषीमंत्री भरणे म्हणाले, कारखान्याच्या वाटचालीत सभासदांइतकेच कामगारांचेही योगदान मोलाचे आहे. आज साखर उद्योगात खासगी कारखान्यांचे आव्हान वाढत आहे.
अशा वेळी सहकारी कारखान्यांनी कमीत कमी मनुष्यबळात व खर्चात काटकसर करून चालणे आवश्यक आहे. ‘छत्रपती’ कारखान्यावर ३१ हजार सभासद, हजारो कामगार आणि ऊसतोडणी मजुरांचे प्रपंच अवलंबून आहेत. हा कारखाना टिकला तरच आपण सगळे टिकू, ही जाणीव ठेवून सभासदांनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला गळीतासाठी द्यावा.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, “आपल्या कारखान्यात व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात कोणतीही भिंत नाही. कामगारांनी ‘माझा कारखाना माझी जबाबदारी’ ही संकल्पना स्वीकारून सन २०२५-२०२६ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला आहे. कारखान्यासमोर आर्थिक अडचणी असतानाही दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वी कामगारांचे पगार केले जात आहेत. कामगारांनी स्वतःचा आणि नातेवाईकांचा ऊस आपल्याच कारखान्याला देण्यासाठी प्रयत्न करावेत.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी, ‘श्री छत्रपती’ कारखान्याने राज्यात सर्वप्रथम त्रिपक्षीय करारानुसार १० टक्के वेतनवाढ लागू केल्याबद्दल संचालक मंडळाचे जाहीर आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते युवराज रणवरे यांनी केले. या सोहळ्याला कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव
निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर व राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र तावरे, कारखान्याचे अधिकारी व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.




