Dattatray Bharne: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! राज्यात खतांची टंचाई होणार? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मोठा इशारा
Dattatray Bharne: खत वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी आणलेल्या 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणी लवकरच दूर होणार.

Dattatray Bharne – राज्यात सध्या खतांचा पुरवठा सुरळीत असून, पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धाच्या परिस्थितीमुळे भविष्यात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू नये म्हणून केंद्रीय कृषिमंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत,
असेही त्यांनी सांगितले. सन २०१९ मधील कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक आहे, त्यांना लाभ मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांना आता दोन लाखांवरील अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामुळे मोठा आधार मिळेल, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
खत वितरण ॲपमधील त्रुटी दूर करणार!
खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे, मोबाईल नेटवर्कची समस्या आदी सर्व तांत्रिक अडचणी लवकरच सोडवल्या जातील, अशी ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिली.





