Operation Lotus : सोलापुरात ऑपरेशन लोटस यशस्वी; तीन माजी आमदार अन् रणजितसिंह शिंदेंच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, तीन माजी आमदार आणि एका माजी आमदार पुत्राचा येत्या बुधवारी (२९ ऑक्टोबर) मुंबईत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यात राजन पाटील यांनी उपस्थिती लावली होती. याच दौऱ्यात सोलापुरातील या चार नेत्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली. यापूर्वी या नेत्यांनी फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
मात्र, सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता. कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले, तसेच यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवले होते. यामुळे प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रवेशाला हरकत घेतल्याची चर्चा होती. परंतु, मित्रपक्षाच्या विरोधाला न जुमानता भाजपने हा प्रवेश निश्चित केला. फलटण येथील बैठकीत फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, रणजितसिंह शिंदे आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात चर्चा झाली. यात २९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली. पालकमंत्री गोरे यांनी चारही नेत्यांना फोनद्वारे ही माहिती कळवली.
“आमच्यासाठी सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. निष्ठेने काम करण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे राजन पाटील यांनी सांगितले. प्रवेशाची तारीख जाहीर झाल्याने समर्थकांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट व्हायरल केल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांपूर्वी सोलापूरात भाजपने आपले बळ वाढवण्यास सुरुवात केली आहे.





