Narinder Kaur Bharaj : आम आदमी पार्टीच्या (आप) संगरूर येथील आमदार नरिंदर कौर भराज यांनी गुरुवारी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. सैनी यांनी आपल्याला २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी देण्याची ऑफर दिली, मात्र आपण ती स्पष्टपणे नाकारली, असा दावा भराज यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावत हा आप चा जुना प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हटले आहे. चंदीगड येथे पत्रकारांशी बोलताना भराज म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी एका बंद दरवाजा आड बैठकीचा प्रस्ताव मांडला आणि संगरूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे आमिष दाखवले. तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासनही मला देण्यात आले. परंतु, मी त्यांना ठणकावून सांगितले की मी आज जी काही आहे, ती केवळ आप आणि पंजाबच्या जनतेमुळे आहे, अशा शब्दांत भराज यांनी आपली भूमिका मांडली. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आणि जनतेने आमदार केले. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनाला आपण बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सैनी यांनी पंजाबची काळजी करण्याऐवजी स्वतःच्या हरियाणा राज्यावर लक्ष केंद्रित करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.दुसरीकडे, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सचिव प्रवीण अत्रे यांनी हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.