Dasara Melava : ठाकरे गटाची भव्य तयारी; दसरा मेळाव्यासाठी 227 शाखा प्रमुखांवर दिली मोठी जबाबदारी

मुंबई : शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बहुप्रतिक्षित दसरा मेळावा यंदा भव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी सज्ज झाला आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना भवनात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः उपस्थित राहून रणनिती आखली. या बैठकीत खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, महेश सावंत यांच्यासह मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सविस्तर चर्चा झाली.
227 शाखा प्रमुखांवर मोठी जबाबदारी
मुंबईतील शिवसेनेच्या 227 शाखा प्रमुखांना दसरा मेळाव्याच्या आयोजनाची आणि यशस्वीतेसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक शाखा प्रमुखाला आपल्या शाखेतून किमान 100 ते 125 शिवसैनिक मेळाव्यासाठी आणण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. यामुळे मुंबईतूनच जवळपास 2 लाख शिवसैनिक मेळाव्यात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, राज्यातील इतर भागांतूनही मोठ्या संख्येने शिवसैनिकांना मेळाव्यासाठी आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रमुखांना देण्यात आली आहे.
शिवसेना भवनातील या बैठकीत दसरा मेळाव्याच्या प्रत्येक पैलूवर सखोल चर्चा झाली. मेळाव्याच्या ठिकाणापासून ते शिवसैनिकांच्या उपस्थितीपर्यंत आणि सभेच्या संदेशापर्यंत सर्व बाबींवर बारकाईने विचार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाची ताकद आणि एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. यंदाचा मेळावा शिवसेनेच्या राजकीय दृष्टिकोनाला आणि भविष्यातील रणनितीला दिशा देणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




