पंढरपूरमध्ये दर्शन रांगेत ढकला ढकली; गलथान व्यवस्थापनामुळे भाविकांची गैरसोय

पंढरपूर – श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत आज ढकला ढकलीचा प्रसंग घडला. सुदैवाने अनर्थ झाला नसला तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे दर्शन रांगेतील त्रुटी आणि गलथान व्यवस्थापनाचा फटका भाविकांना बसला आहे. विशेष म्हणजे आषाढी यात्रेच्या नियोजनाची तयारी गेली दोन महिने प्रशासन करीत आहे. असे असताना हा गोंधळ उडाला.
यंदा प्रशासनाने आषाढी वारी संदर्भात दोन महिन्या पासून नियोजन सुरु केले. स्थानिक पातळी वरून म्हणजे प्रांताधिकारी , जिल्हाधिकारी ते अप्पर सचिव अशा वरिष्ठ पातळी पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. मात्र आज सकाळी या साऱ्यावर पाणी पडले. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था केली जाते.
ही रांग मंदिरापासून दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत असते. त्या ठिकाणाहून ही रांग आज सुरु झाली. त्या ठिकाणी कोणतेही नियोजन मंदिर समितीने केले नाही. आणि भाविकांची गर्दी वाढली आणि ढकला ढकलीचा प्रसंग घडला.
याबाबत मंदिर समितीचे कार्यकरी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, रस्त्याच्या कामामुळे रांगेची व्यवस्था केली नाही . मात्र तात्काळ व्यवस्था केली आहे. या पुढे भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.





