वाई तालुक्यात ‘अंधार’ पण ‘वसुली’चा झगमगाट कायम !

कुमार पवार / वाई : एकीकडे वीज नसल्याने घराघरांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वसुलीचे सूर गगनात घुमवले आहेत. वाई शहरासह संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू असून, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. पावसाचा थेंब नाही, वाऱ्याचा झोत नाही, आणि वीजच काय तिची चाहूलसुद्धा नाही.
मात्र, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे डोळे ग्राहकांच्या रकमेवर आणि रिडिंगवर खिळलेले आहेत. सेवेचे भान नाही, पण वसुलीची घाई मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाई तालुक्याच्या ग्रामीण भागांपासून शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत, वीजपुरवठा दिवसभरात चार-चार वेळा खंडीत होतो आहे. काही ठिकाणी तासन् तास वीज गायब असते, तर काही भागांत ‘कट-पुन्हा जोड’ हा नित्यक्रम बनलेला आहे.
विशेष म्हणजे, वीज गायब होतानाही न सांगता जाते, आणि येतानाही कोणतेही सूचनाशिवाय येते – जणू वीज विभागालाच आपल्या जबाबदारीचा विसर पडला आहे. “मेंटेनन्स” हे शब्द कंपनीच्या दैनंदिन कामकाजातूनच हद्दपार झाले आहेत. वायरमन सारखे कर्मचारी, जे विद्युत दुरुस्तीचे काम करायला हवेत, ते मात्र ३० युनिटपेक्षा कमी रिडिंग असलेल्या मीटरांच्या तपासणीमध्ये वसुलीच्या मोहिमेत गुंतले आहेत.
वाई तालुक्यात वायरमन पदांची भरती अत्यंत अपुरी आहे. उपलब्ध कर्मचारी वसुलीच्या कामात इतके गढले आहेत की खरे काम – म्हणजे तुटलेले वायर्स, बंद ट्रान्सफॉर्मर्स, खंडीत वीज – या साऱ्या गोष्टींकडे त्यांचे लक्षच जात नाही. ग्रामीण भागात जळालेले फ्यूज, तुटलेल्या लाइन, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर हे प्रश्न तासन् तास तसेच प्रलंबित राहतात.
पण वायरमन मात्र ‘मीटर का रिडिंग का?’ हेच विचारताना दिसतात.यातूनच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होत आहेत. एका बाजूला उष्णतेने हैराण झालेले नागरिक, आणि दुसऱ्या बाजूला केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित केलेले कर्मचारी यामध्ये संबंध अधिकच तणावग्रस्त झाले आहेत.
वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी “सेवा ही आमची प्राथमिकता” अशी घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र “वसुली हीच आमची जबाबदारी” अशी मानसिकता दिसून येते.
नागरिकांच्या तक्रारींकडे सरळ दुर्लक्ष करत, हे अधिकारी वसुलीच्या आकड्यांचीच उजळणी करताना दिसतात. जनतेच्या डोळ्यांत अंधाराचे काजवे झगमगत असताना, अधिकाऱ्यांच्या टेबलावर मात्र वसुलीच्या आकड्यांची तेजस्वी प्रकाशरेषा दिसते आहे. असा हा ‘वसुलीप्रधान’ व्यवहार पाहून, वाई तालुक्यातला सामान्य ग्राहक सौरभर झाला आहे.
वाईचा ‘क्रमांक पहिला’… पण सेवेमध्ये ‘शून्य’!
पुणे विभागाच्या ४० डिव्हिजनमध्ये, पुणे, सातारा आणि सोलापूर या मोठमोठ्या जिल्ह्यांच्या शर्यतीत वाई तालुक्याने वसुलीच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. म्हणजेच, येथील नागरिकांनी सर्वाधिक प्रमाणात वीजबिलं भरून ‘जबाबदार ग्राहक’ असल्याचा पुरावा दिला आहे. मात्र विडंबना अशी की, एवढ्या प्रामाणिकपणानंतरसुद्धा वाईकरांना नियमित वीज मिळत नाही.
पुरवठ्याची साखळी सतत तुटते, सेवा कोलमडते, आणि तरीसुद्धा अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता कायम असते. “आम्ही वेळेवर बिल भरतो, मग वीज वेळेवर का नाही? सेवा मिळत नसेल, तर आम्ही का भरावे बिल?” अशा प्रश्नांनी नागरिकांची चीड आता उफाळून आली आहे.
मेल्यावरही वाट पाहावी लागते…
वाई शहरातील एका समाजसेवकाने संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी व्यतीत केले. पण अखेरचा निरोप घेण्यासाठीदेखील त्यांना ‘सेवे’ची प्रतीक्षा करावी लागली! अंत्यसंस्काराच्या क्षणी वाई नगरपालिकेचा नादुरुस्त जनरेटर आणि वीज वितरण कंपनीचा लपंडाव यामुळे स्मशानभूमीतही अंधार दाटला.
मृतदेहासमोर कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकीय उभे… पण दाहविधीसाठी ‘वीज येईपर्यंत’ थांबावे लागले! हा केवळ ‘साहजिक अडथळा’ नव्हे, तर मानवतेवरची एक काळी छाया होती. “या व्यवस्थेला आता माणसाच्या मृत्यूलाही वेळ नाही!” स्मशानात मृत व्यक्तीने वीजेची वाट पाहावी लागणं हे शासन-प्रशासनाच्या मृत मूल्यांचीच जिवंत साक्ष आहे!





