Weather Update : राज्यातील धरणसाठ्यात ४७ टीएमसीने वाढ

मुंबई – राज्यात १० दिवस आधीच मान्सूनचे आगमन असून काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात ४७ टीएमसीने वाढ झाली आहे. विशेषत: राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी धरणात तीन दिवसांमध्ये तब्बल २८९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वाढला आहे.
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, १९ मे रोजी राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून १८ हजार ६१७ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. त्यात ११ हजार ३८१ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा होता.
२७ मे रोजी एकूण पाणीसाठा १९,०५२ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून त्यापैकी ११ हजार ५२० एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठवण क्षमतेच्या २८.४५ टक्के हा साठा आहे. पावसामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी झाला आहे.
नागपूर आणि अमरावती विभागात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. त्यामुळे या विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, पुणे, नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये २४ तारखेला ५ हजार ५२९ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजेच २५.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो २७ मे रोजी ७ हजार ६२७ दशलक्ष घनमीटर म्हणजे २६.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये हाच आकडा २४ मे रोजी २ हजार ४४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३७.१४ टक्के होता. तो २७ मे रोजी २ हजार ६६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३७.५३ टक्क्यांवर आला आहे.
मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी धरणांचा पाणीसाठा वाढण्याजोगा पाऊस झालेला नाही. उलट कोकण विभागातील पाणीसाठा ३६.८८ टक्क्यांवरून ३५.७५ टक्क्यांवर आला आहे.





