इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांनी विविध समस्यांवर मेधा पाटकरांशी केली चर्चा, लवकरच आंदोलन उभारणार

इंदापूर : इंदापूर तालुक्यांमधील व इतर भागातील धरणग्रस्तांचे प्रश्न व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांवर प्राध्यापक कृष्णाजी ताटे आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांची सविस्तर झाली. धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी पुढील काही दिवसात आंदोलन उभारले जाणार आहे.
अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अकरावे द्वैवार्षिक अधिवेशन दिनांक 22 व 23 मार्च रोजी ‘आपलं घर’ नळदुर्ग येथे संपन्न झाले. यावेळी मेधा पाटकर यांनी इंदापूर तालुक्यांमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांची चर्चा केली.
या अधिवेशनास उद्घाटक म्हणून नर्मदा बचाव आंदोलनातील नेत्या मेधा पाटकर होत्या. “विकासाच्या नावाखाली सरकार आदिवासींना विस्थापित करीत आहे. त्यांचा रोजगार हिरावून घेतला जातोय. हे एकीकडे असतानाच राज्य सरकार शिक्षणातून अंग काढून घेऊ पाहते. आदिवासी, महिला, मुले यांच्या मूलभूत हक्कांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, असा इशारा मेधा पाटकर यांनी दिला.
प्रमुख वक्ते डॉ.अभिजीत वैद्य यांनी केंद्र सरकारचा शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाविषयी विविध उदाहरणांसह चिकित्सा केली. यावेळी सुरेखा खरे यांना मेधा पाटकर यांच्या हस्ते ‘शिवाजीराव खैरे पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर पन्नालालजी सुराणा, डॉ.शरद जावडेकर, राजाभाऊ महाजन, डॉ.सुरेश खुरसाळे, एम.एस.पाटोळे, विलास वकील, प्रा. कृष्णाजी ताटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिटा राॅड्रीग्यूस यांनी केले, तर आभार शिवाजी सुरवसे यांनी मानले.





