दखल : वृक्षारोपणाचा उत्साह, पण…

– डॉ. राजू गुरव
वृक्षारोपण हा आता उत्साही कार्यक्रम झाला आहे. ज्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते तेवढे त्या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मग पुन्हा पुढच्या वर्षी उत्साहात वृक्षारोपण केले जाते.
मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला, तरी तोसुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडेच आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे व त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे जतन, संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे.
वृक्षारोपण मोहिमेत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सहभाग वाढायला पाहिजे. ‘पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा! देश वाचवा!’ या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही आता काळाची गरज बनलेली आहे.
‘निसर्ग’ हा मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी, वनसंपत्ती यांना लाभलेले मोठे वरदान आहे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे होय.
सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनी प्रदूषणामुळे वसुंधरेचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे गरजेचे आहे.
बदलती जीवनशैली, वाढणारे शहरीकरण व त्यातून होणारी प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद वापर, बांधकामांसाठी टेकड्या-पर्वतांचे खोदकाम, नद्या-खाड्यांमधून होणारे रेती उत्खनन, जल-वायू प्रदूषण, अणुचाचण्या, वाढत्या वाहनांमुळे होणारे वायू-ध्वनी प्रदूषण या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचे बेसुमार नुकसान होत आहे.
जीवसृष्टीच्या दृष्टीने जीवन रक्षक कवच असलेला ‘ओझोन वायू’चा थर कमजोर होत चालला असून मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पर्यावरणाचा असमतोल बिघडल्याने अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अति उष्णतामान, ऋतुमानात होणारे बदल, भूकंपाचे हादरे बसणे या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. या समस्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
राज्य शासन, शिक्षण संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व अन्य विविध संस्था मोठा गाजावाजा करत दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबवितात. वृक्षारोपण मोहिमेचे फोटोसेशनही केले जाते. कागदोपत्री अहवालही रंगवले जातात. प्रत्यक्षात मात्र काही कालावधीनंतर ते वृक्ष जागेवर दिसतच नाही अथवा त्या वृक्षाची दुरवस्थाच झाल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळते.
वृक्षारोपण मोहीम ही केवळ दिखावा करण्यासाठी राबविण्याची मानसिकता आता बदलण्याची नितांत गरज आहे. वृक्षारोपण मोहिमेत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तन-मन-धनाने भाग घ्यावा. ‘एक मूल, एक झाड’ लावून, त्याची निगा राखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कडक कायदे करून जंगलामधील वृक्षतोड कुठल्याही परिस्थितीत रोखली पाहिजे. जंगलांच्या संवर्धनासाठी वन्यप्राण्यांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे.
जलप्रदूषण थांबविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांद्वारे सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी नद्या, खाड्या, समुद्राच्या पाण्यात मिसळणार नाही यासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर निर्बंध लादल्यास जल प्रदूषणाला आळा बसणार आहे.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करून ‘वसुंधरा बचाव’ ही आता लोकचळवळ उभी राहिली आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ हा संदेश संतांनी रयतेला दिला आहे. ‘वृक्ष’ ही वसुंधरेची हिरवी फुफ्फुसे असून याच फुफ्फुसांच्या माध्यमातून तुम्हा-आम्हास जगण्यासाठी आजीवन प्राणवायू मिळत असतो.
वसुंधरेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीमही राबविण्याची आवश्यकता आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे अभियान राबवून पृथ्वीवरील जलसाठ्याचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास मानवाला पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही.
वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत चालल्या असून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरजही निर्माण झालेली आहे. पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
आपल्याला व आपल्या पुढील पिढीला स्वच्छ हवा व स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरण संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. शाळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करावे. त्यामुळे मुलांना वृक्षांचे महत्त्व समजेल व पुढे जाऊन ते वृक्षारोपण करण्याकडे लक्ष देतील.
पर्यावरण संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे हे मानव विसरला आहे. पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणाचा होणारा र्हास ही आज जागतिक समस्या बनली आहे. त्याला मानवाच्या इच्छा आकांक्षा कारणीभूत आहेत. पृथ्वीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पावले उचलायला हवीत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन प्रकल्प हाती घेऊन ते सक्षमपणे राबविले पाहिजेत.
पर्यावरण संवर्धन हे केवळ शासन, संस्थांचे काम नाही, तर ते प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने योगदान दिल्यास पर्यावरणाचे संतुलन टिकविता येणार आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी हवा, पाणी आणि जमीन यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेणे आणि त्याची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.





