Today TOP 10 News: पार्थ पवारांवर अद्याप का गुन्हा नाही?, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये – उद्धव ठाकरे –
‘कोण होतास तू.., भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू’ –
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय मिळाले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांसाठी सरकारने कोणता प्रस्ताव पाठवला होता हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला हिंदूत्व शिकवू नये, असा पलटवार देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केला आहे. शहा यांचा एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. कोण होतास तू काय झालास तू, असे ट्विट फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून केले होते. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांना म्हणू इच्छितो की कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू.. त्यांनी एक पांघरून मंत्री तयार करायला पाहिजे. पांघरून खाते तयार केले पाहिजे. एवढ्या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी जवळ घेतले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
पार्थ पवारांवर अद्याप का गुन्हा नाही? –
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण –
पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडलेत. त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही कारवाईत एफआयआर हा पहिला टप्पा असतो. पण एफआयआरमध्ये नाव आले म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी आहे असे नसते किंवा एफआयआरमध्ये नाव नाही याचा अर्थ तो दोषी नाही असे होत नाही, असे ते म्हणाले. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळा सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर महार वतनाची 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींना घेतल्याचा आरोप आहे. सरकारने हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण आता विरोधक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सरकारवर चौफेर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार –
मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र –
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी लोकायुक्तांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अण्णांनी तपोवनातील वृक्षतोडीलाही विरोध दर्शवला आहे. नाशिक येथील वृक्ष तोडीवर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावीत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.
शेतकरी 8 वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत –
सरकारनेच दिली कबुली –
एकीकडे सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दावे करत असले, तरी वस्तुस्थिती मात्र भीषण आहे. 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरूनही राज्यातील तब्बल 6 लाख 56 हजार शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाचे आदेश असूनही या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळालेला नाही. खुद्द सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात ही कबुली दिल्याने सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था उघड झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही गंभीर बाब समोर आली.
अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात –
ट्रक दरीत कोसळला, २२ कामगारांचा मृत्यू –
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात घडला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला. त्यात एकूण २२ कामगार होते, जे सर्वजण या अपघातात मृत्युमुखी पडले. यापैकी १९ कामगार आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुक्री टी इस्टेटचे रहिवासी होते. हे कामगार रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी जात असताना हैलोंग-चकलागम रस्त्यावर मेटेलियांगजवळ ट्रकचा ताबा सुटला आणि तो डोंगरावरून खाली कोसळला, असे वृत्त आहे. ट्रक दरीत पडताना रस्त्याने जाणाऱ्यांनी पाहिले आणि जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव आणि मदत कार्य सुरू केले.
PM कार्यालयात मोदी-राहुल यांची दीड तास बैठक –
बैठकीत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित –
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गदारोळात, बुधवारी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बंद खोलीत एकत्र बैठक घेतली. सुमारे दीड तास चाललेली ही बैठक पंतप्रधान कार्यालयात झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. ही बैठक नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि 8 माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बोलावण्यात आली होती. सूत्रांनुसार, राहुल गांधींनी बैठकीत सर्व नियुक्त्यांच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षनेत्यांनी निवडलेल्या नावांचे अधिक तपशील मागितले आणि प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत लेखी स्वरूपात आपले असहमती पत्र सादर केले. राहुल गांधी बुधवारी दुपारी 1 वाजता बैठकीत सहभागी होण्यासाठी PMO मध्ये पोहोचले होते. बैठक 1:07 वाजता सुरू झाली. 88 मिनिटांनंतर राहुल गांधी PMO मधून बाहेर आले. बैठकीत तिन्ही सदस्यांमध्ये काही नावांवर सहमती झाली की नाही, हे अद्याप सार्वजनिक झालेले नाही.
मोदी-पुतिन यांचा कारमधील फोटो अमेरिकन संसदेत –
खासदार म्हणाल्या, ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण फेल –
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अमेरिकेतही चर्चेचा विषय बनला आहे. एका अमेरिकन खासदाराने पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या सेल्फीचा फोटो दाखवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. अमेरिकन प्रतिनिधी सिडनी कॅमलेगर-डव यांनी मोदी-पुतिन यांच्या फोटोकडे निर्देश करत सांगितले की, हे पोस्टर हजार शब्दांच्या बरोबरीचे आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत धोरणावर तीव्र टीका केली. डव म्हणाले, “ट्रम्प यांची भारताबाबतची धोरणे अशी आहेत की जणू आपण स्वतःचेच नुकसान करत आहोत. दबाव टाकून भागीदारी करणे महागडे ठरते. आणि हे पोस्टर याचा सर्वात मोठा पुरावा आहे. अमेरिकेचे दबाव टाकणारे धोरण भारताला रशियाच्या जवळ ढकलत आहे.”
सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी –
अमेरिकेच्या व्याजदर कपातीचा परिणाम –
सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी, ११ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार पुन्हा तेजीत परतले. सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला, तर निफ्टी २५,९०० च्या जवळ पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी काही काळासाठी घसरले असले तरी, ते लवकरच घसरणीतून सावरले. अमेरिकेच्या व्याजदर कपातीमुळे आणि भारत-अमेरिका व्यापार करार लवकर होण्याची आशा असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स ४२६.८६ अंकांनी वधारून ८४,८१८.१३ वर बंद झाला. निफ्टी १४०.५५ अंकांनी वाढून २५,८९८.५५ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७९ टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.५१ टक्क्यांनी वधारला. आजच्या व्यवहारात ऑटो, मेटल, आयटी आणि टेलिकॉम समभागांमध्ये सर्वाधिक खरेदी झाली. आरोग्यसेवा, औषधनिर्माण आणि रिअल्टी समभागांमध्येही लक्षणीय खरेदी झाली. तेल आणि वायू हे एकमेव क्षेत्र घसरून बंद झाले.
ऐश्वर्यासोबत घटस्फोटावर अभिषेकने सोडले मौन –
म्हणाले- आम्ही दोघे एकमेकांची सत्यता जाणतो –
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत होते. एकाच कार्यक्रमात दोघे वेगवेगळ्या वेळी पोहोचल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. पण दोघांनीही या बातम्यांवर मौन बाळगले. आता अभिषेक बच्चनने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकने मुलगी आराध्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले आहे. त्याने सांगितले की, त्याची मुलगी या गोष्टींशी कशी सामोरे जाते. पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकला घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारण्यात आले. उत्तरात अभिनेत्याने म्हटले – ‘आधी त्यांना आमचे लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचे होते, आता ते घटस्फोटाबद्दल बोलत आहेत. माझी पत्नी माझे सत्य जाणते आणि मी तिचे सत्य जाणतो. आम्ही एक आनंदी आणि निरोगी कुटुंब आहोत. आमच्यासाठी फक्त हेच महत्त्वाचे आहे.
माजी रणजीपटू रमेश वैद्य यांचे निधन –
नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्र रणजी संघाला अनेक क्रिकेटपटू दिले आहेत. त्यापैकी एक असलेले माजी रणजीपटू रमेश वैद्य यांचे आज मुंबई येथे निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. नाशिक जिल्ह्याचे ते प्रसिद्ध अष्टपैलू डावखुरे क्रिकेटपटू होते. रमेश वैद्य यांनी १७ वर्षे नाशिक जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यातील तीन वर्षे त्यांनी संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने त्यांना २००३ साली जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल नाशिक क्रिकेट विश्वात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.





