TOP 10 News: मुसळधार पावसाचा इशारा ते आणखी एका मंदिरात देणगी चोरीचा आरोप; जाणून घ्या आजच्या Top 10 News
Top 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी..

1. ‘आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा’; मुसळधार पावसाचा इशारा
महराष्ट्रात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून हवामान विभागाने आज, ४ जुलै रोजी राज्याच्या विविध भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2. उद्धव ठाकरेंना ‘पक्ष रक्षा आंदोलन’ करण्याची अधिक गरज; आठवलेंचा टोला
राम मंदिरातील चोरीचा पैसा भाजपनं पक्षफोडीसाठी वापरल्याचा दावा ठाकरेंनी केला आहे. तसेच राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी येत्या रविवारी म्हणजेच ५ जुलै रोजी दादर येथील हनुमान मंदिराजवळ भव्य ‘रामरक्षा’ आंदोलन करण्याची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी ‘पक्ष रक्षा आंदोलन’ करण्याची अधिक गरज असल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. तसेच आठवले म्हणाले, “जेव्हा अयोध्येला जाण्याची योग्य वेळ होती, तेव्हा ते गेले नाहीत. आता ते रामरक्षा आंदोलनासाठी जात आहेत. मात्र ते तिकडे असताना त्यांच्या पक्षातील उर्वरित आमदार, खासदारही दुसरीकडे जाऊ नयेत, याची काळजी त्यांनी घ्यावी,” असा खोचक सल्लाही रामदास आठवले यांनी दिला.
3. अंगावर झाड कोसळल्याने माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा मृत्यू
मुंबईतील चेंबूरमध्ये एका स्कुल बसवर झाड पडन झालेल्या दुर्घटनेत 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मीरा-भाईंदरमध्येही अंगावर झाड कोसळून युवकाने आपला जीव गमावल्याची माहिती आहे. राहुल अशोक पाटील असे मृत युवकाचे नाव असून दुचाकीवरुन जात असताना त्याच्या अंगावर नारळाचे झाड पडल्याने ही दुर्दैवी घडली. अपघातानंतर राहुलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राहुल हा माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा मुलगा होता. दरम्यान, झाडपडीच्या या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पावसाळ्यात वृक्ष कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
4. एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण आणि दगदग याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना एकनाथ शिंदे यांना ताप आला होता आणि त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि ते तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु असून एकनाथ शिंदे यांनी प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
5. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हे चुकीचे; राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
विधानसभेत पुण्यातील खंडित होणारा वीजपुरवठा आणि स्मार्ट मीटरसंदर्भात आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर बोलताना आमदार चेतन तुपे, निलेश राणे, नाना पटोले यांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येत असल्याचा मुद्दा मांडला. यावर ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच विद्युत अधिनियम २००३ आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण मीटर विनियम २००६ नुसार सर्व वीज कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यात १ कोटी २३ लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ३ लाख ९२ हजार ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींचेही निवारण केले जात आहे. याबाबत आमदारांनी विनाकारण गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन केले. तसेच स्मार्ट मिटर बसवणे हे बंधनकारक करण्यात आलं आहे. पण प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणे हे ग्राहकांच्या इच्छेवर आहे, असं स्पष्टीकरण राज्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलं.
6. राम मंदिरानंतर बद्रीनाथ धाममध्येही देणगी चोरी होत असल्याचा आरोप
उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथील राम मंदिराच्या देणगीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असतानाच, आता उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धाम मंदिरातील भाविकांच्या देणगीमध्ये अफरातफर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बद्रीनाथ धाममधील दान चोरीच्या संदर्भातील काही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी तत्काळ पावले उचलली. त्यांनी सांगितले की, “सोशल मीडियावर फिरत असलेल्या आरोपांची मंदिर समितीने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.” यासोबतच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागवण्यात आलं आहे.
7. खरी तृणमूल काँग्रेस आमचीच, बंडखोर नेत्यांचा दावा
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला असून पक्षातून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने कोलकात्यातील पक्षाच्या संघटनात्मक मुख्यालयावर दावा केला आहे. या गटाने आपणच ‘खरी तृणमूल काँग्रेस’ असल्याचा दावा करत पक्षाच्या नाव व निवडणूक चिन्हावरही हक्क सांगितला आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत गटाने हा दावा फेटाळून लावत तो बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. बंडखोर गटाने शुक्रवारी पक्षाच्या कार्यालयात प्रवेश करून तेथे बैठक घेतली. कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकावर पक्षाध्यक्ष म्हणून ममता बॅनर्जी यांच्याऐवजी अरूप रॉय यांचे नाव नमूद करण्यात आले होते. बैठकीनंतर ऋतब्रत बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप लावून चावी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. Top 10 News
8. अयातुल्ला खामेनेईंवर होणार अंत्यसंस्कार; राष्ट्राध्यक्षांना अश्रू अनावर
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांचा 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. तब्बल 131 दिवसांनंतर 9 जुलै रोजी त्यांच्यावर इराणमधील मशहद शहरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आता त्यांच्या अंत्यदर्शनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. खामेनेई यांच्यासोबत त्यांच्या 14 महिन्यांच्या नातीला, पत्नीला, मुलीला आणि जावयालाही श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. खामेनेई यांना मशहदमधील इमाम रेझा दर्ग्यात दफन करण्यात येणार आहे. इमाम रेझा हे शिया इस्लाममधील आठवे इमाम मानले जातात. अनेक नामवंत शिया धर्मगुरूंना येथेच दफन करण्यात आले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासह देशातील वरिष्ठ नेतृत्वाने तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे उपस्थित राहून खामेनेई यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन भावूक होऊन अश्रू अनावर झाले.
9. अनेकदा निवड पण खेळाडूला मैदानावर उतरण्याची प्रतीक्षा कायम
अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची क्रिकेट विश्वात चांगलीच चर्चा आहे. आयर्लंड दौरा आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्लेईंग-११ मध्ये स्थान मिळाले नसले, तरी त्याचे पदार्पण फार दूर नाही. पण दुसरीकडे, फलंदाज अभिमन्यु ईश्वरन याची अनेकदा भारतीय कसोटी संघात २६ वर्षांचा असताना निवड झाली, पण आजपर्यंत त्याला मैदानावर उतरून देशासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. अभिमन्यु ईश्वरनची पहिल्यांदा २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झाली होती. मात्र, त्यावेळी रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी फॉर्मात असल्याने त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. नुकत्याच पार पडलेल्या २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण पाचही कसोटी सामन्यांमध्ये त्याला बेंचवरच बसावे लागले. इंग्लंड दौऱ्यातही त्याच्या नशिबी हीच उपेक्षा आली. धक्कादायक बाब म्हणजे, अभिमन्यु ईश्वरनची पहिल्यांदा टीम इंडियात निवड झाल्यापासून आजपर्यंत भारतासाठी तब्बल १७ नवीन खेळाडूंनी टेस्ट डेब्यू केले आहे.
10. ‘महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी, नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प’
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच घरात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. याचा फटका फक्त सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जनक’ बंगल्यात देखील पावसाचं पाणी शिरले आहे. यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबईत महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं तरीही नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प आहेत. आज राज्यात भाजप व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज सत्तेत असलेल्या कित्येकांनी रस्त्यावरच्या पाण्यात अक्षरशः डुबकी घेऊन नको ती नौटंकी केली असती. अनेक कलाकारांनीही वेगवेगळे डायलॉग मारले असते. पण आज तसं कुणीही दिसत नाही. याला काय म्हणावं?’ असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. Top 10 News
हेही वाचा:
Ketan Aggarwal Case : सिया-चेतनचा ‘कोडवर्ड’ गेम उघड! मोबाईलमधील डिलिट डेटा ठरणार महत्त्वाचा पुरावा?






