पिंपरी | दै. प्रभात प्रभाव : अखेर खोपोली – पळसदरी रस्त्याची डागडुजी सुरु, नागरिकांचा त्रास होणार कमी

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली – हाल फाटा मार्गे पळसदरी – कर्जत मार्गाची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असतानाच डोळवली व केळवली दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले होते. यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे बनले.
याबाबत 8 जुलै रोजी दैनिक प्रभात वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध करताच संबधित ठेकेदाराने तात्पुरते खड्डे बुजविले. यामुळे नागरिकांचा त्रास काहीसा कमी झाल्याने प्रवासी व नागरिकांनी दैनिक प्रभातचे आभार मानले आहेत.
सरकारने लाखो रुपये खर्च करुन खोपोली – पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती काही वर्षांपूर्वी केली होती. या रस्त्याच्या निर्मितीने खोपोली – कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले. या रस्त्यामुळे भिवपुरी, नेरळ, बदलापुर, कल्याण, मुरबाड आदी अनेक शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरु असताना पावसाळ्यामुळे डोळवली व केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली.
येथील मोठंमोठे खड्डे अपघाताचे कारण बनत आहेत व वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. लहान मोठे अपघात सातत्याने होत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत होते. या रस्त्यावरुन आजुबाजुच्या गावातील नागरिक, शाळकरी मुले मोठ्या प्रमाणावर ये – जा करतात.
हा रस्ता त्वरीत दुरूस्त करावा अशी मागणी वाहन चालकासह प्रवासी करत असताना ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. दैनिक प्रभातने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर हालचालींना वेग आला असून खड्डे भरण्याचे काम सुरु झाले आहे.
कर्जत मार्गावरील केलवली व डोलवली दरम्यान रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले होते. यासंदर्भात अपघात रोखण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तात्काळ खड्डे बुजवावे असे आदेश देण्यात आले होते.
तर या आदेशाचे संबंधित ठेकेदारांनी दखल घेत खड्डे बुजवले आहेत, तसेच पुढील काळात ठेकेदारांनी या ठिकाणी तत्पर राहत खड्डे पडल्यास ते बुजवावे – मिलिंद खोपडे पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे





